Glenn Maxwell Double Hundred in World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करत अविश्वसनीय द्विशतक ठोकले. या द्विशतकासह त्याने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ७ बाद ९१ अशा बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं आणि ७ बाद २९३ पर्यंत मजल मारली. यापैकी २०१ धावा त्याने एकट्याने काढल्या. एक पाय जखमी असतानाही त्याने मोठा लढा देत संघासाठी विजयश्री खेचून आणली. या विजयासह मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तसेच विश्वचषक स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मॅक्सवेलने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील मोठा विक्रमही मोडित काढला.
मॅक्सवेलने या सामन्यात १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावा फटकावल्या. या द्विशतकासह त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे. मॅक्सवेलआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल या दोन धडाकेबाज फलंदाजांच्या नावावर आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम गप्टीलच्या नावावर आहे.
ख्रिस गेल हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा जगातला पहिला खेळाडू आहे. त्याने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरोधात ही कामगिरी केली होती. गेलने १४७ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीने २१५ धावा फटकावल्या होत्या. त्याच विश्वचषक स्पर्धेत जगाला आणखी एक द्विशतकवीर मिळाला. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने वेस्ट इंडिजविरोधात द्विशतक ठोकलं होतं. गुप्टीलने १६३ चेंडूत २४ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने तब्बल २३७ धावा फटकावल्या होत्या. त्याने गेलचा २१५ धावांचा विक्रमही मोडला.
हे ही वाचा >> “…आणि त्यानंतर मॅक्सवेल थांबलाच नाही”, अफगाणिस्तानच्या कर्णधाराने केलं असं केलं ‘त्या’ ऐतिहासिक खेळीचं वर्णन!
खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा
मॅक्सवेलने गुप्टिल किंवा गेलचा विक्रम मोडला नसला तरी त्याची खेळी या दोघांपेक्षा श्रेष्ठ ठरते, कारण खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने हे द्विशतक ठोकलं आहे. गुप्टिल आणि गेल हे दोघेही सलामीवीर होते. तर मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारताच्या कपिल देव यांनी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अशीच खेळी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली. त्याचीच पुनरावृत्ती ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी मुंबईत केली. मॅक्सवेलने कपिल देव यांचा नाबाद १७५ धावांचा विक्रम या खेळीद्वारे मोडला.