Glenn Maxwell Allegations on Virendra Sehwag and PBKS IPL 2017: आयपीएल २०२५ पूर्वी सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूने म्हणजेच ग्लेन मॅक्सवेलने पंजाब किंग्ज आणि वीरेंद्र सेहवागबद्दल बोलताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. वीरेंद्र सेहवाग बराच काळ पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. आयपीएलमधील आपल्या जुन्या दिवसांविषयी बोलताना मॅक्सवेलने सेहवागवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्याने सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. गेली ७ वर्षे हे दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत, यामागील कारणही त्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; अभिमन्यू इश्वरनसह २ नव्या चेहऱ्यांना संघात संधी; पाहा कसा आहे संपूर्ण संघ

ग्लेन मॅक्सवेल-द शोमॅन पुस्तकात मॅक्सवेलने केला मोठा खुलासा

मॅक्सवेलच्या नवीन पुस्तकातील काहीसा भाग मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये २०१७ मध्ये झालेल्या वादाबद्दल मॅक्सवेलने लिहिलं आहे. मॅक्सवेल २०१४ पासून किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) चा भाग होता, जिथे त्याची सुरुवातीची कामगिरी उत्कृष्ट होती. त्यामुळे त्याला आयपीएल २०१७ मध्ये संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याच मोसमात पंजाबचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागची संघाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या मोसमात पंजाबचा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अवघ्या ७३ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना ९ विकेटने गमावला होता. ज्यामुळे संघ पुढील फेरीत जाऊ शकला नाही.

हेही वाचा – IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, मयंक यादवला दुखापत; ३ नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी

वीरेंद्र सेहवाग आणि ग्लेन मॅक्सवेल एकमेकांशी का बोलत नाहीत?

२०१७ मधील संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर तो स्वत: पत्रकार परिषदेत जाऊन बोलणार होता. पण सेहवागने त्याला जाऊ देण्यास नकार दिला आणि सेहवाग स्वत: पत्रकार परिषदेसाठी गेला होता. यानंतर जेव्हा ग्लेन मॅक्सवेल संघाच्या बसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला कळले की त्याला संघाच्या मुख्य व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सेहवागने पत्रकार परिषदेत त्याच्याबद्दल बरंच काही बोलल्याचं त्याला समजलं. सेहवागच्या मते, मॅक्सवेल दुर्दैवी ठरला होता. याबरोबरच सेहवागने असंही म्हटलं होतं की, मॅक्सवेल पुढे येऊन कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारत नाही.

मॅक्सवेलला हे सर्व कळताच वाईट वाटलं. त्याने सेहवागला मेसेज करत म्हटले, ‘आज तुम्ही माझ्याबद्दल जसं बोलला आहात त्यानंतर माझ्या रूपाने एक चाहता गमावला आहे.’ यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाला, ‘मला तुझ्यासारखा चाहताही नको आहे.’ यानंतर मॅक्सवेल आणि सेहवाग एकमेकांशी बोलले नाहीत ते आजपर्यंत. यानंतर मॅक्सवेलने फ्रँचायझीला सांगितले की त्याला यापुढे संघाबरोबर राहायचे नाही. जर सेहवाग संघाचा भाग असेल तर तो संघात राहणार नाही. मॅक्सवेलच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेला सात वर्षे झाली आहेत, पण आजपर्यंत या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी संवाद साधलेला नाही.

हेही वाचा – IND vs NZ: एकतर्फी पराभव किंवा मोठा विजय! पुण्यातील खेळपट्टीचा रेकॉर्ड टीम इंडियाला धडकी भरवणारा, नेमका काय आहे इतिहास?

प्लेईंग इलेव्हनची निवड सेहवाग करत असे

मॅक्सवेल म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनची निवड करताना मला वाटले की व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रशिक्षकाचा समावेश करून निर्णय घेतला तर अधिक सोयीच होईल, यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि सेहवाग वगळता सर्वांनी आपापली प्लेईंग इलेव्हन शेअर केली. मात्र, सेहवागने स्वत: प्लेइंग इलेव्हनची निवड करणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही सामना हरत होतो आणि या काळात सेहवागने अनेक निर्णय घेतले जे संघासाठी आवश्यक नव्हते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenn maxwell allegations on virendra sehwag and soured relationship with him at kings xi punjab in his book bdg