Australia vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match: यंदाच्या विश्वचषकातला सर्वात अविश्वसनीय निकाल मंगळवारच्या सामन्यात लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करताना अफगाणिस्ताननं चारही बाजूंनी जगातल्या सर्वोत्तम संघाची कोंडी केली होती. पण मॅक्सवेल मैदानात आला आणि त्यानं आख्खं मैदान त्याच्या ऐतिहासिक खेळीनं दणाणून सोडलं. स्टेडियममध्ये मॅक्सवेलच्या खेळीसाठी चीअरिंग करणाऱ्या क्रिकेट चाहत्यांनी अविरतपणे त्याच्या नावाचा घोष चालवला होता. ऑस्ट्रेलियासाठी वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम आता मॅक्सवेलच्या नावावर नोंद झाला आहे. मॅक्सवेलच्या या खेळीचं तितक्याच खिलाडूपणे अफगाणिस्तानच्या कर्णधारानं वर्णन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोडलेल्या कॅचेसमुळे झालं नुकसान…

खरंतर समोरचा फलंदाज आपल्या गोलंदाजीची पिसं काढून संघाला पराभूत करून गेल्यानंतर त्याचं इतक्या मनापासून कौतुक करणारा अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची प्रतिक्रिया सध्या कौतुकास पात्र होत आहे. सामना संपल्यानंतर हशमतुल्लाह म्हणाला, “आजच्या पराभवाने मी निराश झालोय. क्रिकेट हा एक धमाल खेळ आहे. पण आज जे घडलं ते आम्हा सगळ्यांसाठीच अविश्वसनीय होतं. आमचं आजच्या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व होतं. आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली सुरुवात करून दिली होती. पण शेवटी आम्ही सोडलेले काही कॅच आमच्यासाठी नुकसान करणारे ठरले”, असं हशमतुल्लाह म्हणाला.

मॅक्सवेलचा सुटलेला कॅच टर्निंग पॉइंट

दरम्यान, अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी मॅक्सवेलचा सोडलेला कॅच हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्याचं हशमतुल्लाह म्हणाला. “आमच्याकडून ती संधी हुकली आणि त्यानंतर मॅक्सवेल थांबलाच नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं श्रेय त्याला आहे. मला वाटतं तो कॅच सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर मॅक्सवेलनं उच्च दर्जाचा खेळ केला. त्याच्या भात्यात सर्व प्रकारचे शॉट्स होते. तो ते हवे तसे मारत होता. त्यानं आम्हाला संधीच दिली नाही”, अशा शब्दांत हशमतुल्लाहनं मॅक्सवेलच्या खेळीचं वर्णन केलं.

AUS vs AFG: अविश्वसनीय द्विशतक! ग्लेन मॅक्सवेलच्या वादळाचा अफगाणिस्तानला तडाखा, दिमाखदार विजयासह ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

“आमच्या कामगिरीचा मला अभिमान”

दरम्यान, यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचं सार्थ कोतुक करायलाही हशमतुल्लाह विसरला नाही. “आमच्या गोलंदाजांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मला माझ्या संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे. आजच्या पराभवामुळे संघाची निराशा झाली हे खरं आहे. पण हीच तर या खेळाची मजा आहे. आमचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर आहे. आम्ही त्या सामन्यात अधिक चांगली कामगिरी करू. इब्राहिम झादरानला त्याच्या खेळीचा नक्कीच अभिमान वाटत असेल. मलाही त्याचा अभिमान वाटतो. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे”, असं हशमतुल्लाह म्हणाला.

मॅक्सवेलची अजरामर खेळी!

ग्लेन मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाला फक्त हा सामना जिंकून दिला नसून त्यानं संघाला सेमीफायनलमधलं स्थानही पक्कं करून दिलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी आजपर्यंत वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्येचा शेन वॅटसनचा (१८५) विक्रम आजच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं २०१ धावा करत मोडला. शिवाय त्यानं पॅट कमिन्ससोबत केलेली २०२ धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियासाठीची आठव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

विजयासाठी २९२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कापून काढली. एकवेळ ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाच्या ७ विकेट्स होत्या. पण त्यानंतर मॅक्सवेल नावाचं वादळ वानखेडेवर घोंगावलं आणि अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला आणखी एक धक्कादायक निकाल त्यानं हिरावून घेतला. त्याचं द्विशतक आणि संघाचा विजय मॅक्सवेलनं एक उत्तुंग षटकार खेचून साजरा केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenn maxwell double century australia in semi final afg captain hashmatullah shahidi praised pmw
First published on: 07-11-2023 at 23:13 IST