ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने टी-२० क्रिकेटमध्ये एक शानदार खेळी साकारली. बिग बॅश लीग २०२१-२२च्या सामन्यात त्याने मेलबर्न स्टार्सकडून खेळताना होबार्ट हरिकेन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. बिग बॅश लीगमधील हा त्याचा १०० वा सामना होता. आयपीएल २०२२मध्ये तो विराट कोहलीसोबत आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. त्याला संघाने रिटेन केले आहे. आयपीएल २०२१ मध्येही तो आरसीबीचा भाग होता. बिग बॅश लीगमधील मॅक्सवेलचे हे दुसरे शतक आहे.
ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूत शतक पूर्ण केले. बिग बॅश लीगच्या इतिहासातील हे दुसरे वेगवान शतक आहे. वेगवान शतकाचा विक्रम क्रेग सिमन्सच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये पर्थ स्कॉचर्सकडून खेळताना अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध ३९ चेंडूत शतक झळकावले होते. मॅक्सवेलने पहिल्या १०० धावांमध्ये १४ चौकार आणि ३ षटकार मारले. या सामन्यात कर्णधार ग्लेन मॅक्सवेल सलामीवीर म्हणून उतरला. मॅक्सवेलने या सामन्यात ६४ चेंडूत नाबाद १५४ धावा कुटल्या. त्याने २२ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
हेही वाचा – कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला झाला ‘मोठा’ फायदा; मॅच सुरू असताना मिळाली ‘गूड न्यूज’!
ग्लेन मॅक्सवेलच्या एकूण टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर हे त्याचे पाचवे शतक आहे. यापूर्वी त्याने ३१९ डावांत ७५६५ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत. २०२१चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचाही तो भाग होता. त्याने ७९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८४४ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. तसेच ३३ विकेट्स घेतल्या.