आयपीएलच्या सहाव्या लिलाव सोहळ्यात यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटजगताला चांगलेच हादरे दिले. जुन्याजाणत्यांकडे पाठ आणि ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंना पाट असाच
यंदाच्या या लिलावाचा थाट होता. ग्लेन मॅक्सवेल हा फक्त आठ एकदिवसीय आणि नऊ ट्वेन्टी-२० सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाच्या २४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू रविवारी
झालेल्या ‘लिलावाचा राजा’ ठरला. सर्वाधिक एक दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम मोजून त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. श्रीलंकेचा जादुई फिरकी गोलंदाज अजंठा मेंडिससाठी पुणे वॉरियर्सने सात लाख २५ हजार डॉलर्स (३.८ कोटी रु.) हा भाव मोजला. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पाऊल न ठेवलेला ऑस्ट्रेलियाचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने अनपेक्षितपणे सात लाख डॉलर्सची कमाई केली. यंदाच्या लिलावात मायकेल क्लार्क आणि रिकी पाँटिंग या ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी यशस्वी कर्णधारांचा ‘बोलबाला’ असेल अशी चर्चा होती, परंतु हे दोन्ही खेळाडू त्यांच्या आधारभूत किमतीलाच म्हणजे चार लाख डॉलर्स (२.१ कोटी रु.) अनुक्रमे पुणे वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्सला विकले गेले.
आयपीएल लिलाव : पर्व ६
१०८ : उपलब्ध खेळाडू
९ : फ्रँचायजी
३७ : संघ मिळविण्यात यशस्वी खेळाडू
११.८९ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
यांनी खरेदी केली..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सात, हैदराबाद सनरायजर्सने सहा, तर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी पाच खेळाडू खरेदी केले. याचप्रमाणे पुणे वॉरियर्सने चार, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रत्येकी तीन, तर कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंची खरेदी केली.
यांना कुणीच वाली नाही!
ऑस्ट्रेलियाचा डग बोलिंजर आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथ या ताऱ्यांप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचा व्हर्नन फिलँडर आणि हर्शेल गिब्स, इंग्लंडचा रवी बोपारा, ऑस्ट्रेलियाचा जेम्स होप्स, मॅथ्यू व्ॉड आणि टिम पॅनी या खेळाडूंविषयी एकाही फ्रँचायजीने उत्सुकता दर्शविली नाही. न्यूझीलंडच्या जेकॉब ओरमला मुंबई इंडियन्सने नंतर खरेदी केले.
भारताचा अभिषेक बहुकिमती!
यंदाच्या रणजी हंगामात अष्टपैलू कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिषेक नायरचे नशीब पालटले आहे. दोनच दिवसांपूर्वी नायरचा निवड समितीने भारतीय ‘अ’
संघात समावेश केला. आता आयपीएलच्या लिलावात तो सर्वाधिक भाव मिळालेला भारतीय क्रिकेटपटू ठरला. नायरला पुणे वॉरियर्सने ६ लाख ७५ हजार अमेरिकन
डॉलर्सला खरेदी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा