किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याप्रकरणी सामनाधिकारी रोशन महानामा यांनी सक्त ताकीद दिली आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पंजाबला दारुण पराभव पत्करावा लागला. या लढतीदरम्यान मॅक्सवेलने नाराजी व्यक्त केली होती.
‘‘दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे त्याला सामनाधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमानुसार मॅक्सवेलने आचारसंहितेतील पहिल्या स्तरावरील नियमाचे (कलम २.१.५) उल्लंघन केले आहे,’’ असे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.