IND vs AUS Virat Kohli Video: आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा सामना भारत व ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे आव्हान दिले आहे. भारताच्या फलंदाजी दरम्यान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचा एक बॉल थ्रो चुकून विराट कोहलीच्या डोक्याजवळ जाणार असल्याचे दिसत होते, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये विराट कोहली मॅक्सवेलला जाब विचारायला जात असल्याचे सुद्धा दिसत आहे. अर्थातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकत्र खेळणारे मॅक्सवेल व कोहली चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांच्यातील हा संवाद, हा क्षण हा पूर्णपणे गमतीत व मजेशीर अंदाजात व्हायरल झाला आहे.
आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडियाने इंस्टाग्रामवर मॅक्सवेल आणि कोहली यांचा व्हिडीओ शेअर करताना हा खेळ मजा करण्याचा आहे असे कॅप्शनमध्ये म्हटले होते. मॅक्सवेलने मुद्दामच विराटच्या दिशेने बॉल फेकला होता आणि त्याच्यापर्यंत पोहोचताना वेग फारच कमी होता हे व्हिडीओमध्ये पाहिल्यावर आपल्याही लक्षात येईल. कोहलीने बॉल डोक्याजवळ येताच आपल्या हातानेच थांबवला आणि मग खुणेने “असा काय बॉल टाकतोय” असे म्हणत तो मॅक्सवेलच्या दिशेने जाताना दिसतो.
असा काय बॉल टाकतोय.. मॅक्सवेल व विराट कोहलीचा मजेशीर क्षण व्हायरल
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात मॅक्सवेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने भारताविरुद्ध पहिल्या ५ षटकात केवळ ३४ धावा दिल्या. दुसरीकडे कोहलीने अंतिम सामन्यात कठीण परिस्थिती असूनही ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध ५४ धावा केल्या होत्या.
हे ही वाचा<< “IND vs AUS मॅचसाठी हीच माझी देशसेवा”, आनंद महिंद्रा यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेत म्हटलं, “मी फक्त जर्सी..”
दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ३५ वर्षीय खेळाडूने विक्रमी ५० वे शतक झळकावले होते. एकाच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सात फलंदाजांपैकी कोहली एक आहे. माईक ब्रेअरली (1979), डेव्हिड बून (1987), जावेद मियांदाद (1992), अरविंदा डी सिल्वा (1996), ग्रँट इलियट (2015) आणि स्टीव्ह स्मिथ (2015) यांच्यासारख्या खेळाडूंच्या यादीत आता भारताच्या माजी कर्णधाराचे नाव सुद्धा जोडले गेले आहे.