Glenn Maxwell’s wrist Injured:ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. मॅक्सवेल देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेफिल्ड शिल्डसाठी सामना खेळत होता. सामन्यादरम्यान ग्लेन मॅक्सवेलळा पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. मॅक्सवेलच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु तो त्याचे मनगट घट्ट पकडून मैदानाबाहेर जाताना वेदनांनी त्रस्त असलेला दिसला.
मॅक्सवेलची दुखापत अधिक गंभीर असल्याचे आढळून आल्यास ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तसेच आयपीएल फ्रँचायझी रॉयल आरसीबीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. मॅक्सवेलच्या या पुनरागमनानंतर तो भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन निवड समितीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
फॉक्स क्रिकेटने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सामन्यादरम्यान तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू त्याच्याजवळ आला. मॅक्सवेल झेल घेण्यासाठी खाली वाकला पण त्याच्या आधी चेंडू पडला होता, त्यामुळे चेंडू त्याच्या मनगटावर आदळला. मॅक्सवेल लगेच मैदानावर आपले मनगट धरून वेदनांनी ओरडू लागला, काही वेळाने त्याला मैदानाबाहेरही जावे लागले.
दुखापतीतून सावरल्यानंतर, मॅक्सवेलने त्याच्या पहिल्या स्पर्धात्मक सामन्यात फिट्झरॉय-डॉनकास्टर क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्याने ९१ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
हेही वाचा – New Kit Sponsor: टीम इंडियाला लवकरच मिळणार नवीन किट स्पॉन्सर; ‘या’ ब्रँडसोबत करार करण्यास बीसीसीआय उत्सुक
नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया लवकर बाहेर पडला होता. त्यानंतर काही दिवसांनी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मॅक्सवेलचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. ३४ वर्षीय मर्यादित षटकांचा विशेषज्ञ मॅक्सवेल शनिवारी तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला.