Glenn McGrath Says Shami should learn from Anderson : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शनिवारी धरमशााला येथे पार पाडली. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना जिंकून टीम इंडियाने मालिका ४-१ ने खिशात घातली. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या ७०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. यानंतर ग्लेन मॅकग्राने त्याचे कौतुक करताना मोहम्मद शमीला त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
महान ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रांचे मत आहे की भारताच्या सध्याच्या वेगवान आक्रमणाकडे अजूनही बरेच काही देण्यासारखे बाकी आहे. त्यामुळे मोहम्मद शमीने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून दीर्घ कारकीर्दीसाठी शिकले पाहिजे. एमआरएफ पेस फाऊंडेशनच्या कार्यक्रमावेळी पीटीआयशी बोलताना मॅकग्रा म्हणाले, “आपल्याला वेगवान गोलंदाजांच्या पुढील पिढीची वाट पाहावी लागेल. जसप्रीत बुमराहकडे अजून बराच वेळ आहे. मोहम्मद शमी म्हातारा होत चालला आहे, पण त्याच्यात अजून खूप क्रिकेट बाकी आहे. सध्याचे भारतीय गोलंदाजी आक्रमण अजूनही खूप काही देऊ शकते.”
ग्लेन मॅकग्रा पुढे म्हणाले, “भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट आहे. मोहम्मद शमीकडे नियंत्रण आणि वृत्ती दोन्ही आहे आणि तो परिस्थितीशी झटपट जुळवून घेतो. मोहम्मद सिराज चांगला खेळत आहे. जसप्रीत बुमराहही संघात आहे. भारताकडे चांगले वेगवान आक्रमण आहे.” मोहम्मद शमी पायाच्या स्नायूंच्या शस्त्रक्रियेमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही.
बुमराहला विकेट्स घेणे आणि यशस्वी होण्याचे चावी माहित आहे –
जसप्रीत बुमराह जगातील तीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे का? असे विचारले असता यावर ग्लेन मॅकग्रा म्हणाले, “नक्कीच. शंका नाही. दुखापतीमुळे काही काळ बाहेर राहिल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. जसप्रीत बुमराहला विकेट्स घेणे आणि यशस्वी होण्याचे चावी माहित आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माने सोडले मौन, हिटमॅनने सांगितले कधी ठोकणार क्रिकेटला राम-राम?
शमीला अँडरसनकडून शिकण्याची गरज –
ग्लेन मॅकग्रा म्हणाले की, “मोहम्मद शमीने वाढत्या वयात फिटनेस कसा राखायचा हे जेम्स अँडरसनकडून शिकायला हवे. हे अवघड आहे, पण शमीसारख्या गोलंदाजाकडे अनुभव आहे. वाढत्या वयातही चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर सराव, तयारी आणि प्रेरणा आवश्यक असते. जेम्स अँडरसनकडे पाहा जो ४१ वर्षांचा आहे, परंतु त्याने ७०० वी कसोटी विकेट घेतली आहे आणि चांगली गोलंदाजी करत आहे.” तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला.