Glenn Philips 5 Wickets Haul : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलीप्सने वेलिंग्टन येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी कामगिरी केली. फिलीप्सच्या या शानदार कामगिरीमुळे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला १६४ धावांत गुंडाळण्यात यश मिळाले. ग्लेन फिलीप्स हा न्यूझीलंडसाठी १६ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पाच विकेट घेणारा पहिला किवी फिरकी गोलंदाज ठरला आहे.बॅट आणि बॉल या दोन्हीसह त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडला पहिल्या डावातील खराब सुरुवातीपासून सावरण्यास मदत झाली.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघाला १७९ धावांत ऑल आऊट केले.ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला २०४ धावांची मोठी आघाडी मिळाली. फिलीप्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना ७० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण अशा ७१ धावा केल्या, ज्यामुळे किवी संघ १५० धावांचा पल्ला तरी गाठू शकला. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ विकेटवर १३ धावांच्या पुढे आपला डाव सुरू केला. किवी संघाकडून पाचवा गोलंदाज म्हणून फिलीप्सने गोलंदाजीला सुरूवात केली. त्याने उस्मान ख्वाजाला २८ धावांवर स्टंप आऊट करत प्रभाव पाडला आणि आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा श्रीगणेशा केला.
फिलिप्सने यानंतर ट्रॅव्हिस हेड (२८), मिचेल मार्श (गोल्डन डक), ॲलेक्स कॅरी (३) आणि कॅमेरून ग्रीन (३४) यांचे विकेट घेत आपला प्रभावी स्पेल सुरूच ठेवला. अशा स्थितीत न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी ३६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्यासह ऑस्ट्रेलियाचा डाव १६४ धावांवर आटोपला. फिलीप्सने १६ षटकांमध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स घेतले.
हेही वाचा – IPL 2024 : सर्फराझ खानला दिल्ली कॅपिटल्सने का रिलीज केले? सौरव गांगुलीने सांगितले कारण
१६ वर्षांनंतर केली ऐतिहासिक कामगिरी
फिलिप्ससाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ विकेट्ससह सर्व प्रथम श्रेणी सामन्यांमधील ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. उल्लेखनीय बाब म्हणजे २००८ नंतर न्यूझीलंडच्या एकाही फिरकीपटूने घरच्या मैदानावर पाच विकेट घेतलेल्या नाहीत. ही कामगिरी करणारे शेवटचे दोन किवी फिरकीपटू होते जीतन पटेल आणि डॅनियल व्हिटोरी, ज्यांनी डिसेंबर २००८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
तेव्हापासून ८ इतर देशातील फिरकीपटूंनी न्यूझीलंडमध्ये पाच विकेट घेण्यात यश मिळवले होते. या यादीत हरभजन सिंग (२००९), दानिश कनेरिया (२००९), सुनील नरिन (२०१३), केशव महाराज (२०१७ मध्ये दोन वेळा), जॅक लीच (२०२३), नील ब्रँड आणि डॅन पीट यांचा समावेश आहे.