क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या संघाला, सामनावीराला तसंच मालिकावीराला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. ट्रॉफी आणि चेक असं सर्वसाधारण स्वरुप असतं. पण नुकत्याच झालेल्या ग्लोबल ट्वेन्टी२० स्पर्धेत मालिकावीर शेरफन रुदरफोर्डला चक्क अमेरिकेत जमीन देण्यात आली आहे. अमेरिकेत अर्धा एकर जमीन अशा अनोख्या पुरस्काराने रुदरफोर्डला सन्मानित करण्यात आलं.
काही वर्षांपूर्वी बांगलादेशात झालेल्या ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेत ल्यूक राईटला ब्लेंडरने तर आयोन मॉर्गनला कुकर देऊन गौरवण्यात आलं होतं. भारताच्या जसप्रीत बुमराला श्रीलंका दौऱ्यात दमदार कामगिरीसाठी मिनीट्रक देऊन गौरवण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसनला बूटांच्या लेस आणि बॅटची ग्रिप देण्यात आली होती.
आणखी वाचा: टीम इंडियामुळे BCCIला होणार कोट्यवधींचा फायदा, टीव्ही-डिजिटल हक्क विकून करणार बंपर कमाई
कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत अँटॉन डेव्हविचला स्नॅक गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं होतं. हे सगळं कमी म्हणून आता मालिकावीराला थेट जमीनच देण्यात आली आहे आणि तीही अमेरिकेत. वेस्ट इंडिजचे दिग्ग्ज क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉईड यांच्या हस्ते रुदरफोर्डला जमिनीसंदर्भात चेक देण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
रविवारी कॅनडातल्या ब्रॅम्पटन झालेल्या अंतिम मुकाबल्यात माँट्रेअल टायगर्स संघाने सर जग्वार्स संघाला ५ विकेट्सने नमवत जेतेपद पटकावलं. सरे संघाने प्रथम फलंदाजी करताना १३० धावांची मजल मारली. जतिंदर सिंगने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. मोहम्मद हॅरिसने २३ आणि अय्यान खानने २६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. माँट्रेअल संघाने रुदरफोर्डच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या बळावर सामना जिंकला. ख्रिस लिनने ३१ धावा केल्या. रुदरफोर्डला सामनावीर तसंच स्पर्धेत २२० धावांसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
24वर्षीय रुदरफोर्ड हा जगभरात ट्वेन्टी२० लीग स्पर्धा खेळत असतो. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शेरफन उपयुक्त गोलंदाजीही करतो. आयपीएल स्पर्धेत रुदरफोर्ड दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. आयपीएलमध्ये १० सामने खेळला आहे. रुदरफोर्डने ६ सामन्यात वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे.
२०१८ मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. २०१९ मध्ये दुसरी आवृत्ती झाली. मात्र त्यानंतर कोरोनामुळे खंड पडला. चार वर्षांनंतर यंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.