अव्वल टेनिसपटूंच्या बंडाचा फटका भारताला डेव्हिस चषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बसला. आशिया-ओशियाना गट-१ मधील दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या व्ही. एम. रणजीत आणि विजयांत मलिक यांना एकेरीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने भारतावर पराभवाचे संकट येऊन ठेपले आहे. आता लिएण्डर पेस-पुरव राजा जोडीवर भारताच्या आशा असल्या तरी परतीच्या एकेरीच्या सामन्यांतील पराभव भारतासाठी महागात पडणार आहेत.
२७ वर्षीय रणजीतला पदार्पणाच्या सामन्यात कोरियाच्या मिन येओक चो याच्याकडून १-६, ०-६, १-६ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसऱ्या सामन्यात २२ वर्षीय मलिकने कडवा प्रतिकार केला, पण दुखापतीने तोंड वर काढल्याने मलिकने माघार घेतली. कोरियाच्या सूक-येओंज जेओंग याच्याविरुद्धच्या सामन्यात ४-६, ५-७, ०-३ असा पिछाडीवर असताना मलिकच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावल्याने त्याने माघार घेतली. आता ‘करो या मरो’ सामन्यात लिएण्डर पेस आणि पुरव राजा जोडीला दुहेरीच्या सामन्यात योंग क्यू लिम आणि जी संग नॅम यांचा सामना करावा लागेल.
पहिल्या सेटमध्ये मलिकने जेओंगला कडवी झुंज दिली. पण चौथ्या गेममध्ये मलिकला सव्‍‌र्हिस गमवावी लागली. या आघाडीचा फायदा उठवून जेओंगने पहिल्या सेटवर नाव कोरले. ढोलताशाच्या गजरात सानिया मिर्झासह पेसने मलिकला जोरदार पाठिंबा दिला. दुसऱ्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये मलिकने ब्रेकपॉइंट वाचवला. त्याचबरोबर चौथ्या गेममध्ये चार ब्रेकपॉइंट मिळवले, पण त्यापैकी एकाचेही गुणात रुपांतर करण्यात त्याला यश मिळाले नाही. १०व्या गेममध्ये जेओंगला मलिकची सव्‍‌र्हिस भेदण्याची संधी मिळाली. याच दरम्यान मलिकला दुखापतीचा त्रास जाणवू लागला. पण तिसऱ्या सेटपर्यंत लढत देऊन मलिकने माघार घेतली.

तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात रणजीतला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. रणजीतवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत मिन येओक चो याने धीम्या गतीच्या या कोर्टवर सुरेख खेळ करत मोजके गुण गमावले.

माझ्याकडून फारशी अपेक्षा नसतानाही मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी काहीसा निराश होतो, पण नंतर स्वत:ला सावरत मी माझा नैसर्गिक खेळ केला. चो याने सुरेख कामगिरी केली. त्याने मला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. आता परतीच्या एकेरीच्या लढतीसाठी मी चांगल्या तयारीनिशी उतरेन.
व्ही. एम. रणजीत, भारताचा टेनिसपटू

अपेक्षेपेक्षा आम्ही सहज विजय मिळवला. पण अद्याप ही मोहीम फत्ते झाली नाही. पहिला सामना आम्ही सहज जिंकलो तरी दुसऱ्या सामन्यात कडवा प्रतिकार सहन करावा लागला. आता आम्ही शुक्रवारी होणाऱ्या दुहेरीच्या लढतीवर लक्ष केंद्रित केले आहे. पेस हा भारताचा अव्वल खेळाडू असून तो पुरव राजासह भारताला विजय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
– याँग टू यून, कोरिया संघाचे कर्णधार