पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्यामुळे दोन्ही देशांतील वातावरण बिघडले असताना, त्याचा परिणाम खेळाच्या मैदानावरही जाणवू लागला आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये नऊ पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे हॉकी इंडियावरही टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने वाढता दबाव लक्षात घेऊन पाकिस्तानच्या नऊ खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘‘भारतातील तणावग्रस्त परिस्थितीबाबत पाच फ्रॅन्चायझीमधील सर्व भागीदार, हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि पाकिस्तान हॉकी महासंघाशी चर्चा केल्यानंतरच सर्वानी एकमताने हा निर्णय घेतला आहे,’’ असे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या खेळाडूंना मुंबईत खेळू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिल्यानंतर मुंबई मॅजिशियन्स संघाने आपला तळ मुंबईहून नवी दिल्लीत हलवला होता. पण हॉकी इंडियावरील वाढते दडपण लक्षात घेऊन, हॉकी इंडियाच्या गव्हर्निग कौन्सिलने मुंबई संघातील चार पाकिस्तानी खेळाडूंना परत पाठवले आहे. महमूद रशीद, फारीद अहमद, मुहम्मद तौसिक आणि इम्रान बट हे चार खेळाडू मंगळवारी संध्याकाळच्या विमानाने पाकिस्तानात परतण्याची अपेक्षा आहे, असे हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तान हॉकी महासंघाला (पीएचएफ) याविषयीची कल्पना देण्यात आली असून त्यांनी भारतातील परिस्थिती समजून घेतली आहे. ‘‘या चारही पाकिस्तानी खेळाडूंचा करार वैध राहील. ते एकही सामना खेळले नसले तरी त्यांना संपूर्ण मानधन दिले जाणार आहे. भारतातील परिस्थिती कशी असेल, हे जाणून घेतल्यानंतरच उर्वरित पाच हॉकीपटूंच्या सहभागाविषयीचा निर्णय घेतला जाईल. परिस्थिती आणखी चिघळल्यास आम्ही योग्य तो निर्णय घेऊ,’’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी हॉकी इंडिया लीगच्या उद्घाटनाच्या सामन्यादरम्यान हिंदू युवक सभेच्या दोन कार्यकर्त्यांनी निदर्शने करून सामन्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. पण दिल्ली वेव्हरायडर्स आणि पंजाब वॉरियर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात एकाही पाकिस्तानी खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा