गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू राजेश घोडगे (47 वर्षे) यांचा क्रिकेट खेळत असतानाच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यामध्ये खेळताना घोडगे हे नॉन स्ट्राईकवर उभे होते. अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


राजेश घोडगे हे गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू राहिले आहेत. तडाखेबाज फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. चार दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोशिएशनच्या स्पर्धेत कुडचडे जिमखानातर्फे खेळताना त्यांनी अर्धशतकही झळकावले होते. प्रसिध्द डॉक्टर राखी घोडगे यांचे ते पती असून मडगावच्या नगरसेविका शरद प्रभूदेसाई यांचे ते जावई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. उदय़ा सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

शनिवारी मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात राजेश घोडगे खेळत होते. या स्पर्धेत क्लबचे आजी माजी खेळाडू सहभागी होतात. फलंदाजीदरम्यान नॉन स्ट्राईकला उभे असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. आजी माजी खेळाडूंमध्ये काही डॉक्टर्सही होते. त्यांनी राजेशवर उपचार केले. तरीही प्रकृती खालवत असल्याचे जाणवल्याने त्याला जवळच्याच इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारानंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या रुग्णालयात त्याला मृत जाहीर केले.

काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या भांडूप मध्येही एका 24 वर्षाच्या मुलाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला होता. वैभव केसरकर असं या मुलाचं नाव असून क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं. रूग्णालयात उपचारासाठी नेलं असताना त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader