उदय देशपांडे यांचे प्रतिपादन
तीन दशकांपूर्वी मृतप्राय बनण्यापर्यंत गेलेल्या मल्लखांब या खेळाला पुन्हा उर्जितावस्था आणण्याच्या दिशेने सर्व मल्लखांब संघटकांचे प्रयत्न सुरु आहेत. भारतातील सर्व राज्यांमध्ये मल्लखांब पोहोचला असल्याने देशाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, ग्रामीण क्रीडा स्पर्धेत मल्लखांब हा खेळ पोहोचवणे हे प्रारंभीचे ध्येय आहे. तसेच या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिक मल्लखांब स्पर्धा आयोजित केली असून त्याद्वारे जगभरात मल्लखांब पोहोचवण्याचे आमचे ध्येय असल्याचे ज्येष्ठ मल्लखांब मार्गदर्शक उदय देशपांडे यांनी सांगितले.
देशपांडे यांना राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी त्यांच्या कारकीर्दीसह मल्लखांबाबतच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना सांगितले की, ‘‘१९८०च्या दशकात महाराष्ट्रातदेखील मल्लखांब हा खेळ केवळ चार-पाच जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला होता. तसेच महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश या चारच राज्यांमध्ये अस्तित्व उरले होते. मात्र माझ्यासह काही संघटकांनी या खेळाच्या प्रचार-प्रसाराचा ध्यास घेऊन त्यानंतरच्या दोन-अडीच दशकात हा खेळ देशभरातील २९ राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्’ाात पोहोचवण्यात योगदान दिले. या दशकापासून टीव्हीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातूनही मल्लखांबचा प्रसार होण्यास वेग मिळाला. त्यामुळेच आता हा खेळ पुन्हा एकदा उर्जितावस्थेकडे वाटचाल करतोय, असा विश्वास आहे.’’
‘‘महाराष्ट्रात आता ५००हून अधिक केंद्रांवर मल्लखांब अत्यंत प्रभावीपणे शिकवले जाते. तसेच वेगवेगळ्या देशांकडे बोलावणे आल्याने मी स्वत: ३५ देशांमध्ये जाऊन मल्लखांब खेळाचे विशेष प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. त्यामुळे भारताबाहेर मल्लखांब पोहाचणे शक्य झाले आहे. त्यामुळेच १६ आणि १७ फेब्रुवारीला जागतिक मल्लखांब स्पर्धेचे आयोजन शक्य झाले असून यापुढेदेखील हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक प्रसार पावेल, यासाठी प्रयत्न करणार आहे, ’’ असे देशपांडे यांनी नमूद केले.
‘‘मला मिळालेला जीवनगौरव हा मल्लखांब खेळासाठी आयुष्यभर झटलेल्या माझ्यासारख्या शेकडो मल्लखांबप्रेमींचा सन्मान आहे, असे मी मानतो. त्या सगळ्यांनी झटून हा खेळ पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्या परंपरेचा हा सन्मान आहे, असे मानून मी तो स्वीकारणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.