टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला येत्या २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांसाठी मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर केलं आहे. राज्यातील सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांना राज्य सरकारकडून ६ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. तर रजत आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ४ कोटी आणि २ कोटी रुपये दिले जाणार आहे. तर सांघिक खेळात सुवर्ण पदक पटकवाणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच रजत आणि कांस्य पदक पटकवणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यासोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना राज्य सरकारकडून १०-१० लाख रुपये दिले जाणार आहेत. उत्तर प्रदेशातून १० स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यात नेमबाज सौरभ चौधरी, मैराज खान आणि भालाफेकपटू शिवपाल सिंह, अन्नु राणी यांचा समावेश आहे.

“खूप खेळा, खूप शिका” या अभियानांतर्गत खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानांची निर्मिती केली जात आहे. तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

टोकियो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी करोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे.

Story img Loader