बीजिंगमध्ये २००८ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतीय बॉक्सिंगला खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतले जाऊ लागले. विजेंदर सिंगचे कांस्यपदक आणि भारतीय बॉक्सर्सनी ऑलिम्पिकमध्ये दाखवलेली चमक यामुळे बॉक्सिंग हा खेळ भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकतो, याची खात्री पटली; पण २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयांचा फटका भारताला बसला. त्यामुळे एम. सी. मेरी कोम हिचे कांस्यपदक वगळता अन्य भारतीय बॉक्सर्सना पदकाविनाच मायदेशी परतावे लागले. लंडन ऑलिम्पिकनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रावर मोठे संकट उभे राहिले. बहुतांशी राष्ट्रीय क्रीडा संघटनांवर त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी बंदी आणली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवरही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने बंदी आणली. भ्रष्ट राजकारण्यांच्या मर्जीनुसार घेतलेल्या निवडणुका हे त्यामागचे प्रमुख कारण. काही संघटनांवरील बंदी हटली; पण गेली दोन वर्षे भारतीय बॉक्सिंग मात्र बंदीच्या सावटाखाली होते. भारतीय बॉक्सिंग असोसिएशन ही मूळची राष्ट्रीय संघटना बरखास्त करत बॉक्सिंग इंडिया या नव्या छताखाली देशातील बॉक्सिंग प्रशासक एकत्र येऊन पारदर्शकपणे निवडणुकांना सामोरे गेले. त्यामुळे बॉक्सिंग इंडियाला तात्पुरती मान्यता मिळाली. दोन वर्षांनंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सना देशाच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. उंचावलेल्या आत्मविश्वासाचे सामथ्र्य किती असते, हे भारतीय बॉक्सर्सनी, विशेषत: मेरी कोमने आशियाई स्पर्धेत दाखवून दिले.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर मेरी कोमने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे गेली दोन वर्षे ती बॉक्सिंग रिंगपासून दूर होती. निवड चाचणीत पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमला पिंकी जांगराने पराभवाचा धक्का देत तिचे २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न संपुष्टात आणले. जवळपास १५ पेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत मेरी कोमसमोर तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता; पण मेरी कोमने हार न मानता आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. आशियातील प्रतिस्पध्र्यावर कायम वर्चस्व गाजवणाऱ्या मेरी कोमला मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाने मात्र कायम हुलकावणी दिली होती. अखेर मेरी कोमने या वेळी ती कसर भरून काढली. मार्गात येणाऱ्या प्रतिस्पध्र्याचे अडथळे पार करत ‘मॅग्निफिसंट मेरी’ कोमने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला या स्पर्धेत गतविजेत्या विजेंदर सिंगची उणीव भासली. मात्र त्याची जागा घेणारा विकास कृष्णन आणि सतीश कुमार यांनी उपांत्य फेरीत धडक मारत भारताला पदकाच्या आशा दाखवल्या आहेत. खेळाडूऐवजी पंचांकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे एल. सरिता देवीचे सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. यजमान कोरियाच्या जीना पार्क हिच्यावर संपूर्ण लढतीत वर्चस्व गाजवूनही पंचांनी सरिता देवीला पराभूत घोषित केले. त्यामुळे निराश झालेल्या सरिता देवीने कांस्यपदक न स्वीकारता संयोजकांना धारेवर धरले आहे. पंचांच्या या कृत्याचा फटका सरिता देवीला बसला असला तरी अन्य खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बॉक्सिंगमध्ये सोनेरी पर्व सुरू झाल्याची झलक दाखवून दिली आहे.

Story img Loader