मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या नेयमारचा विश्वचषक प्रवास संपुष्टात आला असला तरी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या ‘गोल्डन बॉल’ पुरस्काराचे मानांकन त्याला लाभले आहे. विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दहा खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. यामध्ये अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी, जेवियर मस्चेरानो आणि अँजेल डी मारिआ, जर्मनीचा फिलीप लॅम, थॉमस म्युलर, टोनी क्रूस आणि मॅट हमेल्स यांच्यासह ब्राझीलचा नेयमार, कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेझ आणि नेदरलँड्सच्या आर्येन रॉबेन यांना स्थान मिळाले आहे. याआधीच्या विश्वचषकांमध्ये २०१०मध्ये उरुग्वेचा दिएगो फोर्लान, २००६मध्ये फ्रान्सचा झिनेदिन झिदान, २००२मध्ये जर्मनीचा ऑलिव्हिर कान तर १९८६मध्ये दिएगो मॅराडोनाने या पुरस्कारावर नाव कोरले होते. सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठी कोस्टा रिकाचा केयलर नवास, जर्मनीचा मॅन्युअल न्युअर आणि अर्जेटिनाचा सर्जिओ रोमेरो हे शर्यतीत आहेत. सवरेत्कृष्ट युवा खेळाडूच्या पुरस्कारासाठी नेदरलँड्सचा मेम्फिस डेपे आणि फ्रान्सचे पॉल पोग्बा आणि राफेल वराने रिंगणात आहेत. ‘फिफा’ची तांत्रिक समिती या विजेत्यांची निवड अंतिम सामन्यानंतर जाहीर करणार आहे.

Story img Loader