World Athletics Championship: गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारा नीरज हा भारतातील पहिला अॅथलीट ठरला आहे. जागतिक क्रमवारीतही त्याचे स्थान अव्वल स्थानावर राहील. गेल्या ३ महिन्यांपासून नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्याच प्रयत्नात नीरज अपयशी ठरला त्याचा पहिला प्रयत्न हा फाऊल झाला. दोघांनी दुसऱ्या फेरीत ८८.१७ मीटर फेकून गटात अव्वल स्थान पटकावले त्यानंतर, गावकरी आणि कुटुंबीयांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून भारत माता की जय अशा घोषणा देत एकच जल्लोष साजरा केला. पाकिस्तानचा खेळाडू नदीमनेही नीरजचे अभिनंदन केले.
सामना जिंकल्यानंतर नीरजचे काका भीम म्हणाले की, “देशाच्या आशीर्वादाने देशाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हा अभिमानाचा क्षण आहे. त्याने देशाची मान उंचावली असून जगात भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.” सामन्यानंतर नीरजची आई भावूक झाली. त्याने केलेल्या या अफाट कामगिरीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
नीरजची आई म्हणाली – माझा मुलगा यावेळी पुन्हा सुवर्ण पदक जिंकेल
बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजसाठी त्याच्या गावातील सर्व लोक आणि नातेवाईक प्रार्थना करत होते. “संपूर्ण देशाचे आशीर्वाद आणि प्रार्थना नीरजच्या पाठीशी असल्याने त्याने हे यश मिळवले आहे.” असे त्याचे वडील सतीश कुमार म्हणाले होते. पुढे ते म्हणाले, “नीरजच्या सामन्याबाबत त्यांनी कोणतीही मोठी पूजा किंवा विधी केलेले नाही.” त्यांनी नीरजशी बोलून सांगितले की, त्याच्यावर पूर्ण विश्वास असून तो पदक जिंकेल अशी आशा असल्याचे म्हटले.”
नीरजच्या आईने त्याच्या सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “सामन्यापूर्वी नीरजने चांगली तयारी केली होती. त्याने त्याच्याकडून संपूर्ण १०० टक्के प्रयत्न करत हे यश मिळवले आहे. नीरज हा देशाचाच एक मुलगा आहे.” आई सरोज देवी पुढे म्हणाल्या होत्या की, “माझा मुलगा यावेळी पुन्हा सुवर्ण जिंकेल, याची आम्हाला खात्री होती आणि त्याने ते खरे करून दाखवले. दुखापतीनंतर पुनरागमन करत त्याने सर्वांना सडेतोड उत्तर दिले. नीरजने सगळ्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्या.”
आई सरोज देवी पुढे म्हणाल्या, “नीरजशी माझे अजून बोलणे झाले नाही. तो कधी येणार आहे हे मला अद्याप माहिती नाही. ज्यावेळी तो गावात येईल त्यावेळी मोठा आनंदोत्सव साजरा केला जाईल. त्याने देशासाठी गोल्ड मेडल जिंकलं आहे.”
नीरजचे काका भीम चोप्रा म्हणाले की, “पात्रता फेरीतील थ्रो अपेक्षित होता, नीरज यावेळी त्याचा सर्वोत्कृष्ट विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे.” नीरजच्या खांद्रा गावात त्याच्या कामगिरीबद्दल गावकऱ्यांमध्ये उत्साह होता. या वेळी पुन्हा गावचा मुलगा भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास सामन्यापूर्वीच गावकऱ्यांना होता. नीरज जिंकताच गावात दिवाळीसारखे वातावरण आहे.
नीरज चोप्रा राउंड मीटर
पहिला फाऊल
दुसरा ८८.१७
तिसरा ८८.३२
चौथा ८४.६४
पाचवा ८७.७३
सहावा ८३.९८
नीरजने आतापर्यंत मिळवलेले सुवर्णपदक
२०१६ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप – सुवर्ण
२०१६ दक्षिण आशियाई खेळ – सुवर्ण
२०१८ एशियाड – सुवर्ण
२०१८ राष्ट्रकुल खेळ – सुवर्ण
२०२० टोकियो ऑलिंपिक – सुवर्ण
२०२२ डायमंड लीग – सुवर्ण
२०२३- जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच – सुवर्ण