‘खेळांचा राजा’ म्हणून अ‍ॅथलेटिक्स या क्रीडाप्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभापासूनच अ‍ॅथलेटिक्स हा स्पर्धेचा अविभाज्य क्रीडा प्रकार मानला गेला आहे. १९५१मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला, तेव्हापासून अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धाना सतत भरघोस लोकप्रियता लाभली आहे. पुरुष व महिला गटात प्रत्येकी २४ क्रीडा प्रकारांचा समावेश असल्यामुळे कोणत्याही देशांना या स्पर्धामध्ये पदके लुटण्याची भरीव संधी असते. त्यामुळेच प्रत्येक देश या खेळांमध्ये अधिकाधिक पदके कशी मिळविता येतील, याचाच विचार करीत असतात.
केवळ आशियाई नव्हे तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये वर्चस्व गाजविणाऱ्या चीनने १९७४मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत झालेल्या प्रत्येक आशियाई स्पर्धेत जपानने अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदके पटकाविली होती. पदके मिळविण्याची खात्री होईपर्यंत चीनने आशियाई व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेतला नव्हता. १९७४मध्ये चीनने या स्पर्धेत पदार्पण करताना २१ पदकांची कमाई केली व त्यानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. नवी दिल्ली येथे १९८२मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चीनने नवोदित खेळाडूंना पाठविले होते. तरीही त्यांनी ३५ पदके मिळविली. जपानने ३६ पदके मिळवीत अ‍ॅथलेटिक्समध्ये चीनला मागे टाकले होते, मात्र या स्पर्धेचा अपवाद वगळता गेली ४० वर्षे चीननेच अ‍ॅथलेटिक्समध्ये मक्तेदारी गाजविली आहे.
मिल्खा सिंग, पी. टी. उषा यांचे वर्चस्व
अ‍ॅथलेटिक्स हा भारतासाठी नेहमीच पदकांच्या तालिकेत मुख्य आधार असलेला क्रीडा प्रकार राहिला आहे. आजपर्यंत भारताने पावणे दोनशे पदकांची कमाई केली आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजेच मिल्खा सिंग यांच्या युगात भारताने कमी अंतराच्या शर्यतींमध्ये वर्चस्व गाजविले होते. फ्लाइंग सीख म्हणून नावलौकिक मिळविलेल्या मिल्खा सिंग यांनी १९५८ व १९६२च्या आशियाई स्पर्धा गाजविल्या. परदुमन सिंग, शिवनाथ सिंग, विजय सिंग चौहान, हरी चंद, बहादूर सिंग चौहान, चांदराम यांनी पुरुष गटात आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला. महिलांमध्ये भारताची सुवर्णकन्या म्हणून ख्याती मिळविलेल्या पी. टी. उषा या धावपटूने १९८६ मध्ये झालेल्या स्पर्धेत चार सुवर्ण व एक रौप्यपदक अशी पाच पदके मिळविली. महिलांमध्येच गीता झुत्शी, ज्योतिर्मय सिकदर, के. एम. बीनामोल, सुनीता राणी, अंजू बॉबी जॉर्ज, प्रिजा श्रीधरन, कविता राऊत आदी खेळाडूंनी भारताचा तिरंगा उंचावला आहे.
संधी आहे, पण..
आशियाई स्पर्धा भारतासाठी नेहमीच फलदायी ठरली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये आशियाई स्तरावरही चुरस वाढली आहे. गतवेळी चीनमध्ये भारताला पाच सुवर्ण, दोन रौप्य व पाच कांस्यपदके मिळाली होती. चीन व जपान यांच्याबरोबरच बहारिन देशानेही गेल्या आठ वर्षांमध्ये अ‍ॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात मोठी झेप घेतली आहे. या तीन देशांबरोबरच यजमान दक्षिण कोरियाचेही आव्हान भारतीय खेळाडूंपुढे असणार आहे. गतवेळच्या आशियाई स्पर्धेनंतर उत्तेजक औषधे सेवनाच्या आरोपाखाली आठ भारतीय धावपटूंना कारवाईला सामोरे जावे लागले होते. या धक्क्यातून सावरायला भारताला खूप वेळ लागला आहे.
टिंटू, सिद्धांत, सुधा सिंगवर भिस्त
राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती टिंटू लुका (८०० मीटर धावणे), गतवेळची सुवर्णपदक विजेती सुधा सिंग (३ हजार मीटर स्टीपलचेस), गतवेळी सुवर्णपदक मिळविणारे जोसेफ अब्राहम (पुरुष ४०० मीटर हर्डल्स), सिद्धांत थिंगलिया (११० मीटर हर्डल्स), अश्विनी आकुनजी (महिला-४०० मीटर हर्डल्स), प्रिजा श्रीधरन (१० हजार मीटर धावणे) यांच्याबरोबरच ऑलिम्पिकपटू कृष्णा पुनिया (थाळीफेक), सहाना कुमारी (उंच उडी) यांच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. ओ. पी. जैशा ही १५०० व ५ हजार मीटर धावणे या दोन्ही शर्यतींमध्ये पदक मिळविण्याबाबत आशावादी आहे. अलीकडेच जागतिक स्तरावरील डायमंड लीगमध्ये चौथे स्थान मिळविणारा विकास गौडा (थाळीफेक) याच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा आहे.

Story img Loader