भारतीय कुस्ती महासंघ व आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघ (फिला) यांच्यामधील मतभेदांचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याला फटका बसला आहे. अझरबैजानमध्ये झालेल्या गोल्डन ग्रां.प्रि.कुस्ती स्पर्धेत त्याला भाग घेण्यास ‘फिला’ने मनाई केली.
या स्पर्धेसाठी योगेश्वर हा भारताचा एकमेव खेळाडू सहभागी होणार होता. त्याच्याबरोबर मुख्य प्रशिक्षक म्हणून विनोदकुमार यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. एप्रिलमध्ये भारतात झालेल्या आशियाई स्पर्धेच्या वेळी झालेल्या खर्चाबद्दल फिलाकडून भारतीय कुस्ती महासंघास काही रक्कम येणे होती. बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या वेळी फिलाने भारतीय संघटकांकडे काही रक्कम मागितली होती. त्या वेळी एकमेकांमधील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन भारतीय संघटकांनी दिले होते, मात्र फिलाने अझरबैजान येथील संयोजकांना योगेश्वरची प्रवेशिका नाकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे एका अव्वल दर्जाच्या स्पर्धेस योगेश्वरला मुकावे लागले.
या संदर्भात योगेश्वरला विचारले असता तो म्हणाला,की ही स्पर्धा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. नवीन नियमावलीनुसार ही स्पर्धा होणार होती. तसेच मी माझ्या नेहमीच्या ६० किलो वजनाऐवजी ६६ किलो गटात सहभागी होणार होतो. दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर माझ्यासाठी ही पुनरागमनाची योग्य संधी होती. दुर्दैवाने दोन संघटनांमधील मतभेदांचा फटका मला बसला आहे.

Story img Loader