सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या आणि अखेरच्या सामन्याच्या तिकिटांच्या गोंधळामुळे सोमवारचा दिवस क्रिकेटचाहत्यांसाठी निराशाजनक ठरला होता. ऑनलाइन तिकीट व्यवस्था कोलमडल्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रिकेटरसिकांना वेबसाइट गाठण्यात खूप अडचणी आल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत १५ तासांमध्ये ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व तिकिट्स संपल्याची ग्वाही ‘क्याझुंगा डॉट कॉम’कडून मंगळवारी देण्यात आली. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)चे उपाध्यक्ष रवी सावंत यांनीही सोमवारी रात्रीच सर्व ऑनलाइन तिकीट्स संपल्याची माहिती दिली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सचिनच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या ऑनलाइन तिकीट व्यवस्थेचे काम पाहणारी ‘क्याझुंगा डॉट कॉम’ ही वेबसाइट गाठण्यात अनेक मंडळींना अथक प्रयत्नांनंतर यश आले. रात्री २ वाजेपर्यंत तिकीट विक्री सुरू होती, असे ‘क्याझुंगा’कडून स्पष्ट करण्यात आले.
सोमवारी पहिल्या एका तासात सुमारे दोन कोटी क्रिकेटरसिकांनी तिकिटांसाठी प्रयत्न केल्यामुळे वेबसाइट गाठणे अनेकांना मुश्कील गेले. एमसीएकडून ३५०० क्रिकेटरसिकांकरिता ऑनलाइन पद्धतीने तिकिट्स उपलब्ध करण्यात येणार होती. हा प्रत्यक्षातील आकडा मात्र स्पष्ट करण्यात आला नसला तरी तो तीन हजारांपेक्षा जास्त होता, असे ‘क्याझुंगा डॉट कॉम’कडून सांगण्यात आले.
‘क्याझुंगा डॉट कॉम’च्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीतू भाटिया यांनी सांगितले की, ‘‘आमची वेबसाइट सोमवारी दिवसभरात एकदाही कोलमडली नाही. तिच्यावर अतिभार पडला आणि ती धीमी झाली. त्यामुळे व्यवहार अतिशय संथगतीने झाले. तिकिट्स ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या पद्धतीने वितरित करण्यात आल्यामुळे काही क्रिकेटरसिक खूश होणे, तर बहुतांशी मंडळींच्या पदरी निराशा पडणे स्वाभाविक आहे. वानखेडे स्टेडियमची प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे, याची सर्वानाच कल्पना आहे. परंतु वेबसाईट गाठण्यात क्रिकेटचाहत्यांना अडचणी येत असूनही आम्ही प्रत्येक तासाला एमसीएला तिकीट व्यवस्थेची माहिती देत होतो.’’
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वतोपरी तयारीनिशी सज्ज झालो होतो. परंतु वेबसाइटवरील वर्दळ ही खूप प्रचंड प्रमाणात होती. प्रत्येक क्रिकेटचाहत्याला दोनपेक्षा अधिक तिकिट्स दिल्या जात नव्हत्या. याचप्रमाणे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या क्रिकेटरसिकांना मंगळवारी दुपारपासून मुंबई हॉकी स्टेडियम येथील काऊंटरवरून आपल्या तिकिट्स उपलब्ध करण्यात आल्या.’’

Story img Loader