Team India Head Coach Gautam Gambhir Press Conference : भारत आणि श्रीलंका यांच्यात २७ जुलै ते ३० जुलै दरम्यान टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर २, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. नवा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेतून टीम इंडियाची जबाबदारी सांभाळतील. श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गौतम गंभीरने त्याचे विराट कोहलीशी असलेल्या वैयक्तिक संबंधावरही प्रतिक्रिया दिली.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे यापूर्वी स्टार फलंदाज विराट कोहलीबरोबर चांगले संबंध नव्हते. मात्र, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर गौतम गंभीरने आपल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहलीसोबतच्या नात्याबद्दल गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘विराट कोहली आणि माझे नाते टीआरपीसाठी नाही तर आम्हा दोघांमधील आहे.’
गौतम गंभीर विराट कोहलीबद्दल काय म्हणाला?
गौतम गंभीर म्हणाला, “विराट कोहलीशी माझे वैयक्तिक संबंध कसे आहेत? हे नाते हेडलाईन आणि टीआरपीसाठी नाही. त्यामुळे विराट कोहलीशी असलेले संबंध वैयक्तिक आहेत. सध्या आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहोत. मैदानाबाहेर माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. पण, हे जनतेच्या टीआरपीसाठी नाही. खेळादरम्यान किंवा नंतर मी त्यांच्याशी किती संवाद साधतो हे महत्त्वाचे नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही दोघेही १४० कोटी भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
गौतम गंभीर पुढे म्हणाला, “विराट कोहलीशी माझे मैदानाबाहेर चांगले संबंध आहेत आणि मी ते पुढेही चालू ठेवीन. पण हो, ते कोणत्याही प्रकारचे संबंध असो, ते सार्वजनिक करण्याची गरज नाही. कारण मला वाटते हे दोन व्यक्तींमधील वैयक्तिक संबंध आहेत. मुख्य प्रशिक्षकपदी माझी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली आणि मी मेसेजद्वारे खूप बोललो आहोत. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, त्यामुळे आम्ही दोघेही टीम इंडियाच्या माध्यमातून देशांची मान उंचावण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करु.”
टीम इंडियाचे श्रीलंका दौऱ्याचे सुधारीत वेळापत्रक –
पहिला टी-२० सामना, २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार), पल्लेकेले स्टेडियम
दुसरा २० सामना, २८ जुलै, संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
तिसरा टी-२० सामना, ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो