India Injured Players Health Update: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यास तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यंदाचा विश्वचषक भारताच्या भूमीवर ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत एकट्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असताना हे प्रथमच घडत आहे. यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते.
भारतीय क्रिकेट संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल ते श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असून एनसीएमध्ये संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अपघातानंतर ऋषभ पंत आता बरा होत आहे. आतापर्यंत प्रत्येकाच्या दुखापतीबाबत सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत होत्या पण आता बीसीसीआयने अधिकृतपणे या खेळाडूंचे आरोग्य अहवाल जाहीर केले आहेत. बीसीसीआयने प्रत्येकाचे वैद्यकीय अपडेट शेअर केले आणि खेळाडूंची माहिती दिली. हे ते खेळाडू आहेत जे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये संघात पुनर्वसन करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेचा विषय म्हणजे स्टार खेळाडूंची दुखापत. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा, के.एल. राहुल आणि ऋषभ पंत हे अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. हे खेळाडू विश्वचषकासाठी तंदुरुस्त आहेत की नाही हे पाहावे लागेल. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या पाच खेळाडूंबाबत एक मोठा अपडेट दिला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा पुन्हा फिटनेसवर भर देत आहेत. दोघेही रोज ७ ते ८ षटके गोलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही फलंदाजीला सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने नेटमध्ये फलंदाजीबरोबरच विकेटकिपिंगही सुरू केली आहे.
बुमराह-कृष्णाने गोलंदाजीला सुरुवात केली
बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा त्यांच्या पुनरागमनच्या अगदी अंतिम टप्प्यात आहेत आणि नेटमध्ये पूर्ण जोर लावून गोलंदाजी करत आहेत. हे दोघे आता काही सराव सामने खेळतील, जे एनसीए आयोजित करेल. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर खूश असून सराव सामन्यांनंतर संपूर्ण मूल्यांकनानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
के.एल.राहुल -श्रेयस अय्यर झपाट्याने बरे होत आहेत
बीसीसीआयने सांगितले की, “के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरने नेटमध्ये फलंदाजी पुन्हा सुरू केली आहे. सध्या संपूर्ण ताकदीने तंदुरुस्त होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीवर भर देत आहेत. बीसीसीआय वैद्यकीय पथक त्यांच्या प्रगतीबद्दल समाधानी आहे. येत्या काही दिवसांत ते दोघेही कौशल्य, ताकद आणि कंडिशनिंगच्या बाबतीत त्यांची प्रगती कळवतील. बीसीसीआयने पंतबद्दल सांगितले की, “ऋषभ पंतने त्याच्या दुखापतीतून झपाट्याने बरा होत असून त्याच्यात लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजी करण्यासही सुरुवात केली आहे. तो सध्या त्याच्यासाठी डिझाइन केलेल्या फिटनेस प्रोग्राम फॉलो करत असून ज्यामध्ये ताकद, लवचिकता आणि धावणे याबाबी समाविष्ट आहेत.