Indian Football Team Participate Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही फुटबॉल संघ सहभागी होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, “भारतीय फुटबॉल संघाची नुकतीच झालेली कामगिरी पाहता क्रीडा मंत्रालयाने नियम शिथिल करून दोन्ही संघांना आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीमॅक यांनी पत्र लिहिल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. आशियाई फुटबॉल संघांच्या फिफा क्रमवारीत दोन्ही संघ अव्वल आठमध्ये नसल्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार भारतीय पुरुष आणि महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत, परंतु दोन्ही संघांची अलीकडची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.
अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की “भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आमचे राष्ट्रीय फुटबॉल संघ, पुरुष आणि महिला दोन्ही आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या सहभागास मान्यता दिली आहे. त्या दोन्ही संघांना मनापसून शुभेच्छा!”
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, “सध्याच्या निकषांनुसार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र नसलेल्या खेळाडूंना सुविधा देण्यासाठी नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडच्या काळातील त्यांची चांगली कामगिरी लक्षात घेऊन मंत्रालयाने या क्रीडा प्रकारात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की ते आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करतील आणि आपल्या देशाचा अभिमान वाढवतील.”
काय आहे क्रीडा मंत्रालयाचा नियम?
क्रीडा मंत्रालयाच्या नियमांनुसार, भारताचा तोच संघ प्रत्येक खेळात भाग घेऊ शकतो, जो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल आठमध्ये समाविष्ट आहे. जर असे आठ संघ आधीच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असतील, ज्यांची क्रमवारी भारतीय संघापेक्षा चांगली असेल, तर भारत या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवत नाही. फुटबॉलच्या बाबतीतही असेच आहे. भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघांपेक्षा वरच्या क्रमांकावर असलेले अनेक संघ या स्पर्धेत आधीच भाग घेत आहेत. याच कारणामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती, मात्र प्रशिक्षक स्टिमॅक यांच्या मागणीवरून नियम शिथिल करण्यात आले असून भारतीय संघ आता या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
स्टिमॅक यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “माननीय पंतप्रधानांना नम्र आवाहन आणि प्रामाणिक विनंती. नरेंद्र मोदी जी आणि माननीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर जी. कृपया आमच्या फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी द्या. आपल्या राष्ट्राच्या अभिमानासाठी आणि तिरंग्यासाठी आम्ही लढू! जय हिंद!” ही मागणी मान्य केल्याने सर्व फुटबॉलप्रेमी आनंदित आहेत.