Rishabh Pant on Team India’s practice session: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमधून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. डिसेंबर २०२२मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत फिटनेसवर काम करत आहे. पंतने मंगळवारी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नेटमध्ये २० मिनिटे फलंदाजी केली. पंतचा सराव पाहून फिटनेस सुधारल्याचे आणखी एक संकेत दिले आहे. यानंतर त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचीही भेट घेतली. पंत बराच वेळ विराट कोहली आणि रोहित शर्माशी बोलताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ सरावासाठी येण्यापूर्वी ऋषभने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) कर्मचाऱ्यांच्या थ्रो डाउनवर फलंदाजी केली. त्याने ऑफ साइडवर काही चांगले ड्राईव्ह मारले आणि काही चेंडू ऑन साइडही खेळले. भारतीय संघातील ‘साइड आर्म’ स्पेशालिस्ट रघूशीही तो बोलला. कोहली व्यतिरिक्त पंत हा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगबरोबरही बराच वेळ बोलत होता. बीसीसीआयने पंतचे फोटोही शेअर केले आहेत.

पंत एनसीएमध्ये खूप मेहनत घेत आहे

डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ आता एनसीएमध्ये पुन्हा फिटनेस मिळवत आहे. तो इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे कारण त्याची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २६ वर्षीय खेळाडूने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरातही भाग घेतला होता. डिसेंबरमध्ये दुबईत झालेल्या लिलावातही तो फ्रँचायझी संघाबरोबर उपस्थित होता.

ऋषभ पंत विकेटकीपिंगपासून दूर राहू शकतो

पाठीच्या आणि घोट्याच्या दुखापतींमुळे तो काही काळ विकेटकीपिंगपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पहिल्या काही सामन्यांमध्ये तो विकेटकीपिंग करणार नसल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याचा संघातील समावेश हा फिटनेस चाचणीनंतरच घेतला जाईल. याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआय निवड समिती घेईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मान्यता मिळाल्यानंतरच तो यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार १७ जानेवारी रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सोमवारी संध्याकाळी उशिरा बंगळुरूला पोहोचला. याची माहिती देताना बीसीसीआयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा: रोहितला सूर गवसणार ? भारत-अफगाणिस्तान तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

भारताने पहिले दोन सामने सहज जिंकून मालिका २-०ने अभेद्य विजयी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आता तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करण्याचे रोहित शर्मा अँड कंपनीचे लक्ष्य असेल. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून शानदार विजय नोंदवत मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वाल शुबमन गिलला मागे अर्धशतक करत ६८ धावा केल्या. अशा परिस्थितीत त्यांना तिसऱ्या टी-२०मध्येही स्थान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good news for team india rishabh pant signaled a comeback batted in the net avw