‘‘महाराष्ट्र सरकारने दिलेली ‘अ’ श्रेणीची नोकरी आणि हॉकी या दोन्ही गोष्टींना योग्य न्याय देण्याचे आव्हान मला पेलायचे आहे. सध्या मी प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडवत असलो तरी महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडवण्याचे माझे मुख्य उद्दिष्ट आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनंजय महाडिकने सांगितले.
धनंजय महाडिक काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या आयकर विभागात साहाय्यक आयुक्तपदी रुजू झाला आहे. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा ‘व्हिडीओ अ‍ॅनालिस्ट’ म्हणून धनंजयची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘मी खेळत होतो, तेव्हा व्हिडीओ अ‍ॅनालिसिससारखी कोणतीही यंत्रणा भारताकडे नव्हती. पण गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी व्हिडीओ अ‍ॅनालिसिस उपलब्ध झाला. त्यामुळे खेळाडूंना कामगिरी सुधारण्यात मदत होत आहे. व्हिडीओ अ‍ॅनालिसिसचा भरपूर फायदा खेळाडूंना होत आहे. मायकेल नॉब्स यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रोएलण्ट ओल्ट्समन आणि एम. के. कौशिक या प्रशिक्षकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंबरोबर काम करताना मला भरपूर काही शिकता येणार आहे. माझ्या अनुभवातून मी खेळाडूंना सर्वोत्तम खेळ होण्यासाठी मदत करणार आहे. तांत्रिकदृष्टय़ा मी सक्षम असून मी काही खेळाडूंना प्रशिक्षणही देत आहे. देशातच चांगले प्रशिक्षक तयार झाले तर आपल्याला परदेशातून प्रशिक्षक आयात करण्याची कोणतीही गरज भासणार नाही.’’
‘‘नोकरी आणि व्हिडीओ अ‍ॅनालिसिस या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना मला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नोकरीत माझ्या विभागातील काम सांभाळूनच मला भारतीय संघाची सेवाही करावी लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात चांगले खेळाडू मला घडवायचे आहेत,’’ असेही बचावपटू धनंजयने सांगितले. महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर धनंजय लवकरच बंगळुरू येथे सुरू असलेल्या भारतीय संघाच्या सराव शिबिरात सामील होणार आहे.

Story img Loader