कोणत्याही खेळाडूने क्रीडा क्षेत्रात देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी त्याच्या पालकांनी केलेल्या त्यागाचे ऋण विसरणे अशक्य आहे, असे भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनानिमित्त आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या सुनील छेत्री (फुटबॉल), धनराज पिल्ले (हॉकी), झहीर खान (क्रिकेट), सानिया मिर्झा, प्रार्थना ठोंबरे (टेनिस), भरत चव्हाण (विशेष ऑलिम्पिक) या खेळाडूंच्या पालकांचा कपिलदेव यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.
‘‘पूर्वी क्रीडा क्षेत्रात आपल्या मुलाने किंवा मुलीने कारकीर्द घडवावी, याबाबत पालक फारसे सकारात्मक प्रोत्साहन देत नसत. आता खूप बदल झाला आहे. आता पालकांकडून खेळाडूंना भरपूर प्रोत्साहन मिळत असते, एवढेच नव्हे तर काही वेळा अतिउत्साहही दाखवतात. यशस्वी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे नेहमीच सत्कार होत असतात. मात्र पुण्यात पालकांचे सत्कार होत आहेत, हा खूपच दुर्मीळ योग आहे,’’ असे कपिलदेव यांनी सांगितले.
‘‘झहीरला गुणवत्तेवर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला होता. त्यानंतर पालकांच्या मेळाव्यात माझ्या मुलाला मी भारताचा अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू बनवून दाखवणार, असे मी म्हटल्यानंतर अनेकांनी माझ्याकडे विस्मयाने पाहिले होते. मात्र मी थोडासा धोका पत्करून त्याला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याची संधी दिली. त्याने अफाट मेहनत करीत माझा निर्णय सार्थ ठरविला. माझ्या निर्णयाचा मला कधीही पश्चात्ताप झालेला नाही,’’ असे झहीरचे वडील बख्तियार खान यांनी सांगितले.
‘‘सानियाने टेनिसपटू व्हावे ही तिच्या वडिलांची इच्छा होती. लहानपणापासून तिने सराव, आहार व विश्रांती याबाबत नियमितपणा राखला आहे. त्यामुळेच ती जगातील अव्वल दर्जाची खेळाडू झाली आहे. दररोज सहा-सात तास ती प्रत्यक्ष टेनिस कोर्टवर सराव करीत असते. परदेशातील स्पर्धाच्या वेळी टेनिस कोर्ट ते निवासाचे हॉटेल असाच तिचा दिनक्रम असतो. अन्य कोणत्याही गोष्टींमध्ये ती रमली नाही,’’ असे सानियाची आई नसीमा मिर्झा म्हणाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा