काही गोष्टी डोळ्यांसमोर घडत असतात, पण हे वास्तव स्वीकारायला मन तयार नसते. हा भास आहे की दु:स्वप्न, हे कळत नाही. पण समोरचे हेलावणारे, हळवे, दु:खी, करुण क्षण माणसाला स्तब्ध करतात, एखादा मोठा धक्का बसल्यासारखे चटका लावून जातात. नेमके हेच चित्र शनिवारी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या निरोप समारंभाच्या दिवशी पाहायला मिळाले. सचिनचा सत्कार, मानवंदना स्वीकारून आपल्या भावनांचा निचरा करत तो पॅव्हेलियनमध्ये गेला तरीही लोकांचा सचिनच्या निवृत्तीवर विश्वास बसत नव्हता. डोळे पाणावलेले होतेच. सचिन आता पुन्हा आपल्याला मैदानात खेळताना दिसणार नाही, ही भावना अस्वस्थ करणारीच होती.
‘‘क्रिकेट काही थांबणार नाही. पण दुसरा सचिनही होणार नाही, हेदेखील तेवढेच खरे. कारण त्याने ज्या पद्धतीने क्रिकेटसाठी समर्पण केले, जी शिस्त त्याने दाखवली ती क्रिकेटची सभ्यतेची भावना जपणारी होती. तो नेहमीच आपला वाटला, म्हणून तो आता पॅव्हेलियनमध्ये गेला असला तरी स्टेडियममधून पाय निघत नाही,’’ असे एका प्रेक्षकाने सांगितले. तथापि, दुसरा प्रेक्षक म्हणाला की, ‘‘सचिनने खेळपट्टीला जो नमस्कार केला, त्यामध्येच तो काय आहे, हे सामावलेले आहे, अजून त्याच्याबाबत काय म्हणणार. मैदानात तो स्वत:ही रडला आणि आता आमच्या डोळ्यांतही पाणी आणून गेला.’’
सचिनने कधीच अलविदा करू नये, अशीच भावना क्रिकेट चाहत्यांच्या मनात होती. सचिन पॅव्हेलियनमध्ये गेला असला तरी ‘सचिन..सचिन..’ हा टाहो सुरूच होता. कारण सचिनला तीन दिवस पाहून त्यांचे मन भरलेले नव्हते. त्यामुळे सचिनने फक्त एक झलक द्यावी, त्यासाठी हा नाद होता. हा नाद पॅव्हेलियनमध्येही पोहोचला. चाहत्यांना दुखावेल तो सचिन तेंडुलकर कसला. वानखेडेवरून सारा संघ बाहेर पडला तरी सचिन पॅव्हेलियनमध्येच होता. चाहत्यांचे आर्जव ऐकल्यावर तो पॅव्हेलियनच्या बाहेर आला आणि दोन्ही हात उंचावून त्याने प्रेक्षकांना अभिवादन करत त्याने वानखेडेसह साऱ्यांचाच द्य मनाने निरोप घेतला. पण सचिनने कधीच अलविदा करू नये, हीच भावना प्रेक्षकांच्या मनात होती.
सचिनच्या मुखदर्शनासाठीही गर्दी
सामना संपल्यावर सर्व खेळाडू संघाच्या बसमध्ये जाऊन बसले तरी सचिन तेंडुलकर आला नव्हता. त्याचा चेहरा डोळ्यांत साठवण्यासाठी प्रेक्षकांनी पॅव्हेलियनच्या मागच्या बाजूला एकच गर्दी केली होती. सचिनने बसच्या दिशेने कूच केल्यावर प्रेक्षकांनी पुन्हा टाहो फोडायला सुरुवात केली. बसमध्ये बसल्यावर सचिनच्या मुखदर्शनासाठी बसच्या मागे प्रेक्षक धावत होते.
कभी अलविदा ना कहना..
काही गोष्टी डोळ्यांसमोर घडत असतात, पण हे वास्तव स्वीकारायला मन तयार नसते. हा भास आहे की दु:स्वप्न, हे कळत नाही. पण समोरचे हेलावणारे
First published on: 17-11-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goodbyes over he went to a small room at the stadium and kept breaking down