जगभरातील क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरूवात होत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी होत असलेल्या ‘हाय-व्होल्टेज’ मुकाबल्यामुळे भारतीयांसाठी तर चॅम्पिन्स करंडक आणखीनच विशेष ठरणार आहे. त्यामुळे आजपासूनच भारतात ICC Champions Trophy चा फिव्हर पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाही याला अपवाद ठरलेला नाही. हाच फिव्हर एन्कॅश करण्यासाठी गुगलकडून नेहमीच्या क्रिएटिव्ह आणि मजेशीर पद्धतीने डुडल तयार करण्यात आले आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ गेम किंवा मोबाईलवर खेळलेल्या क्रिकेट गेम्सप्रमाणेच या डुडलचे स्वरूप आहे. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला बॅट आणि चेंडूच्या सहाय्याने डिझाईन केलेला गुगलचा लोगो दिसेल. या लोगोवरील स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर क्रिकेटच्या सामन्याला सुरूवात होते. मजेशीर गोष्ट म्हणजे या सामन्यात किटक आणि गोगलगाय हे प्रतिस्पर्धी संघ आहेत. तुम्ही या सामन्यात किटक संघाकडून फलंदाजी करू शकता. आजुबाजूला शेत असणाऱ्या हिरव्यागार मैदानावर हा सामना रंगलेला आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून जमलेल्या गोगलगायी आणि किडे डुडलची मजा आणखी वाढवतात. याशिवाय, या सामन्यात पंच असलेली गोगलगायसुद्धा जमिनीखालून अंपायरिंग करते. तुम्ही आऊट झाल्यानंतर ही गोगलगाय आऊटचा फलक घेऊन जमिनीखालून वर येते. महत्त्वाची गोष्ट आऊट झाल्यानंतरही तुम्ही रिफ्रेश बटनावर क्लिक करून वारंवार फलंदाजी करू शकता. एकूणच हे संपूर्ण डुडल तुम्हाला रिफ्रेश करणारे आहे. त्यामुळे तुम्हाला एकदातरी या व्हर्च्युअल मैदानात उतरून खेळलेच पाहिजे.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये सलामीची लढत रंगणार आहे. विश्वचषकापेक्षाही कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण एखादा सामना गमावला तरी स्पर्धेतून बाहेर पडण्याची पाळी कोणत्याही संघावर येऊ शकते. त्यामुळे विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. बांगलादेशपेक्षा इंग्लंडचा संघ नक्कीच उजवा आहे. इंग्लंडला मायदेशातील वातावरणाचा, खेळपट्टय़ांचा चांगलाच अंदाज असेल. त्यामुळे त्यांच्यासाठी ही फारशी कठीण लढत नसली तरी त्यांना गाफील राहून चालणार नाही. कारण क्रिकेटविश्वातील कोणत्याही दिग्गज संघाला धक्का देण्याची कुवत बांगलादेशमध्ये नक्कीच आहे.