पुणे : जगभरात आंतरजाळाचा (इंटरनेट) वापर करताना हवे ते शोधण्याचे माध्यम (सर्च इंजिन) मानल्या जाणाऱ्या ‘गूगल’ने रविवारी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करत खास ‘डूडल’ तयार करून त्यांना आगळी मानवंदना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची रविवारी ९७वी जयंती होती. ऑलिम्पिक पदक मिळवल्यापासून आजपर्यंत खाशाबा आणि त्यांची कामगिरी कायमच दुर्लक्षित राहिली. अशा वेळी जगभरात शोध माध्यमात अग्रस्थानी असलेल्या ‘गूगल’ने त्यांची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त खास ‘डूडल’ची निर्मिती केली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खाशाबांनी आपली कारकीर्द घडवली. वडिलांकडून वयाच्या दहाव्या वर्षी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केल्यावर खाशाबांनी स्वत:ला असे काही घडवले की त्यांच्या कामगिरीचा डंका सर्वदूर पोहोचला. ऑलिम्पिकचे दरवाजे त्यांना सहज उघडले गेले. सर्वप्रथम १९४८ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मात्र, तेव्हा त्यांना गादीवर (मॅट) खेळायची सवय नसल्याने त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ते स्थानही भारतीयांसाठी सर्वोत्तम होते. खाशाबांचे कौतुक झाले, पण ते स्वत: नाराज होते. पुढील चार वर्षांत त्यांनी वजन गट वाढवून कठोर मेहनत घेतली आणि १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले.

ऑलिम्पिक पदकानंतर खाशाबांचे कौतुक झाले. मायदेशी परतल्यावर त्यांची बैलगाडय़ांच्या ताफ्यातून मिरवणूक काढण्यात आली. पण, ज्या मल्लाने जिवंतपणी आपल्या खेळाने देशाची, राज्याची मान उंचावली, तो शासनदरबारी आजपर्यंत दुर्लक्षितच राहिला. त्यांना सन्मान मिळवण्यासाठी अनेक आंदोलने झाली आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस खाशाबांना मरणोत्तर पुरस्कार दिले गेले. अनेकदा मागण्या होऊनही खाशाबा जाधव यांना पद्मश्री हा नागरी सन्मानासाठी अजूनही दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle pays tribute to khashaba dadasaheb jadhav zws