जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी पी. व्ही. सिंधू, थायलंड ओपन स्पर्धा जिंकणारा किदम्बी श्रीकांत यांच्यासह अनेक खेळाडू भारतास ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देतील असा आत्मविश्वास बॅडमिंटनचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी येथे व्यक्त केला.
सिंधू, श्रीकांत, बी. साईप्रणीत, अजय जयराम यांच्यासह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावत आहेत. बॅडमिंटनकरिता हे आशादायक चित्र असून या खेळात कारकीर्द करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे. सायना नेहवाल हिच्या ऑलिम्पिक कांस्यपदकामुळे या खेळात सुगीचे दिवस आले आहेत, असे गोपीचंद यांनी सांगितले. ते म्हणाले, आयबीएल स्पर्धा केवळ भारतीय खेळाडू नव्हे तर परदेशी खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरणार आहे. या स्पर्धेतील बदलते स्वरूप प्रत्येक खेळाडूसाठी आव्हानात्मक आहे व त्यामध्ये सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी त्याला शेवटपर्यंत झगडावे लागणार आहे.
हैदराबादमधील अकादमीविषयी विचारले असता गोपीचंद म्हणाले, या अकादमीत सध्या अनेक राज्यांमधील १५० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आठ कोर्ट्सवर दररोज पहाटे ४-३० ते दुपारी एक व पुन्हा दुपारी ३-३० ते रात्री ७-३० या वेळेत या खेळाडूंना आठ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याखेरीज तीन फिजिओ, एक मसाजिस्ट, तीन फिजिकल ट्रेनर असा सपोर्ट स्टाफही कार्यरत आहे. पन्नास खेळाडूंकरिता वातानुकूलीत निवास व्यवस्था करण्यात आली आहे तसेच त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही अकादमीत केली जाते. खेळाडूंना संतुलित आहार देण्याची जबाबदारी आम्हीच स्वीकारली आहे.
या अकादमीत जलतरण तलाव, अद्यावत व्यायामशाळा अशाही सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा दर आठवडय़ास आढावा घेतला जातो व त्यानुसार त्यांना सूचना दिल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा