भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद हे अतिशय चांगल्या रीतीने खेळाडूंचा विकास करण्याचे काम करीत आहेत, असे जागतिक क्रमवारीतील चौथी मानांकित खेळाडू ज्युलियाना शेंक हिने सांगितले.
शेंक ही आयबीएल स्पर्धेत पुणे पिस्टन्स संघाकडून खेळणार आहे. गोपीचंद यांच्या कामाचे कौतुक करीत तिने सांगितले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतास अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत आणि यापुढेही मिळत राहणार आहेत. त्यांची शिष्या असलेल्या सायना नेहवाल हिने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे. पी.व्ही.सिंधू, बी.साईप्रणित, किदम्बी श्रीकांत आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.
ती पुढे म्हणाली, बॅडमिंटन या खेळाची लोकप्रियता वाढत आहे आणि खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आयबीएल स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंबरोबरच आम्हा परदेशी खेळाडूंनाही अनुभव समृद्धता येण्यासाठी मदत होणार आहे.

Story img Loader