साधनसामग्री आणि विमानखर्चासाठी निधी नसल्यामुळे भारताच्या तीन अॅथलीट्सच्या रशियातील सोची येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना क्रीडासाहित्य आणि अन्य साधनसामग्री विकत घेण्यासाठी साडेदहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘‘क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा विकास निधीअंतर्गत क्रीडासाहित्य विकत घेण्यासाठी १० लाख ५२ हजार रुपये मंजूर केले आहेत. खेळाडूंना आता ऑलिम्पिक निकषानुसार स्कीइंगचे बूट आणि अन्य साहित्य आता उपलब्ध होणार आहे. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या खेळाडूंना या निधीतून क्रीडासाहित्य, विमानप्रवास आणि सोचीतील वास्तव्याचा खर्च भागवता येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयाने सांगितले.
प्रतिष्ठेची स्पर्धा लक्षात घेता, आर्थिक मदतीची अपेक्षा असणाऱ्या खेळाडूंना अधिक मदत केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत झालेल्या क्रीडा संघटनांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शिवा केशवन, हिमांशू ठाकूर आणि नदीम इक्बाल हे भारताचे तीन अॅथलीट ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा