एखाद्या स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होता. राज्य सरकार त्यांना इनाम देऊन पुढील स्पर्धेत त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी तरतूद करतं. मात्र हरयाणा सरकारने राज्यातील बॉक्सिंगपटूंना दिलेलं बक्षिस हे सध्या खेळाडूंना चांगलंच डोईजड होताना दिसत आहे. २०१७ सालात महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत, हरयाणाच्या सहा ज्युनिअर खेळाडूंनी पदकाची कमाई केली. या सहाही पदकविजेत्या खेळाडूंना हरयाणा सरकारने रोख रकमेसह प्रत्येकी १ गाय बक्षीस म्हणून दिली.

म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गायीच्या दुधात पोषक तत्वे ही जास्त असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर हरयणाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हरयाणा सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री प्रकाश धनकर यांनी, खेळाडूंना गाय भेट देण्याचं ठरवलं. शाररिक तंदुरुस्ती राखण्यासाठी खेळाडूंना गायीचं दुध घरच्या घरी उपलब्ध होईल या हेतूने, सरकारने खेळाडूंना गायीचं वाटप केलं होतं.

मात्र हरियाणा सरकारने दिलेल्या या गायी या भाकड असल्याचं समोर येत आहे. सहा खेळाडूंपैकी तीन खेळाडूंनी या गायी सरकारला परत देण्याचं ठरवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एका महिला खेळाडूने सरकारकडून मिळालेली गाय दुधच देत नसल्याचं सांगितलं आहे. “गायीला घरी आणल्यानंतर माझी आई ५ दिवस गायीची काळजी घेत होती. पण दुध देणं सोडा, गायीने आईवर तीनवेळा हल्ला केला. यात माझ्या आईला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे आम्ही ही गाय त्वरित सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला.” रोहतकमधील महिला बॉक्सिंगपटू ज्योती गुलियाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना ही माहिती दिली. ज्योतीचे प्रशिक्षक विजय हुडा यांनी सरकारने खेळाडूंना स्थानिक जातीच्या गायी भेट म्हणून दिल्याचा आरोपही केला.

ज्योतीव्यतिरीक्त नीतू घंगास आणि साक्षी कुमार या दोन खेळाडूंनीही बक्षीस म्हणून मिळालेली गाय परत करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीची निगा राखताना तीने आपल्यावर शिंगानी हल्ला केल्याचं या दोनही खेळाडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे हरयाणा सरकारच्या या अनोख्या बक्षीसाची क्रीडा वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.