Graeme Smith spoke about the challenges facing Rahul Dravid as the coach: डब्ल्यूटीसीच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारतीय संघाला सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडवरही टीका होत आहे. डब्ल्यूटीसी फायनल जिंकून भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा १० वर्षांचा दुष्काळ संपवायचा होता, पण ते शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर असलेल्या आव्हानाचा खुलासा ग्रॅम स्मिथने केला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ हे टीम इंडियासाठी शेवटचे मोठे विजेतेपद होते. २०१३ मध्ये बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या जोरदार विजयानंतर, भारत मोठ्या स्पर्धांमध्ये छाप पाडण्यासाठी संघर्ष करत आहेत. १० वर्षांच्या कालावधीनंतर, संघाची नजर २०२३ च्या उत्तरार्धात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकावर असेल.
भारतीय संघ विश्वचषक मायदेशात आणण्यात अयशस्वी झाल्यास मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला करार वाढविला जाईल की नाही ही सर्वात मोठी चर्चा असू शकते. यावर ग्रॅम स्मिथने भारतीय अनुभवी खेळाडूचे समर्थन केले आहे. त्याच्या मते, भारतीय संघाची पुनर्बांधणी करण्यासाठी द्रविडला आणखी एक संधी द्यायला हवी.
राहुल द्रविडच्या पुढील आव्हाने –
ग्रॅम स्मिथ म्हणाला, “जेव्हा तुम्ही भारतीय क्रिकेटमध्ये लीडरच्या भूमिकेत सामील होता, तेव्हा अपेक्षा अशी असते जी तुम्हाला पूर्ण करायची असते. तुमच्याकडे उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. भारत एकाच वेळी दोन किंवा तीन संघ मैदानात उतरू शकतो. एका लीडरसाठी भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्या संघांचे संतुलन राखणे, तुमच्या दौर्याचे वेळापत्रक, विविध स्वरूपांचे संतुलन राखणे आणि हे काही सर्वात मोठे निर्णय आहेत, ज्यांचा सामना राहुल आणि त्याच्या निवड समितीला करायचा आहे.”
ग्रॅम स्मिथ पुढे म्हणाला, “तो स्कॉडला कसा पाहतो, तसेच या संघांना कसा पुढे घेऊन जातो. हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण तो एक दर्जेदार व्यक्ती आणि दर्जेदार परफॉर्मर आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी ते योग्य दाखवून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला भारतीय संघाची पुनर्बांधणी करण्याची योग्य संधी द्यावी लागेल.” डब्ल्यूटीसीच्या पराभवाचे दु:ख विसरून भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे, जिथे त्यांना तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळायची आहे.