सलग तीन कसोटीत पराभवासह प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका गमावून मानसिकदृष्टय़ा खचलेल्या इंग्लंडला रविवारी आणखी एक धक्का बसला. संघाचा प्रमुख फिरकीपटू ग्रॅमी स्वानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
‘‘खूप विचार करून मी या निर्णयापर्यंत पोहचलो आहे. गेल्या सात वर्षांपासून इंग्लंडचा संघ माझे कुटुंब झाले होते. त्यामुळे या कुटुंबाला सोडण्याचा निर्णय घेणे अतिशय कठीण होते. परंतु माझ्या मते क्रिकेटला अलविदा करण्याची हीच अचूक वेळ आहे,’’ असे स्वानने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘अतिशय प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेतील दोन कसोटी सामने बाकी आहेत. यानंतर भारत आणि श्रीलंकेसारख्या चांगल्या संघाविरुद्ध इंग्लंडला मुकाबला करायचा आहे. माझ्या जागी एखाद्या चांगल्या फिरकीपटूने संघात स्थान मिळवून चमकदार कामगिरी करावी. नेहमीच हक्काने पाठीशी उभे राहणाऱ्या इंग्लंड संघातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि अ‍ॅलिस्टर कुक यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मी यापुढेही इंग्लंड संघाचा कट्टर चाहता राहणार आहे.’’
इंग्लंड संघाचा अविभाज्य घटक असलेल्या स्वानला सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. जगातल्या अव्वल फिरकीपटूंमध्ये गणना होणाऱ्या स्वानने ६० कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना २९.६६च्या सरासरीने २५५ विकेट्स मिळवल्या आहेत.
अचानक निवृत्तीमुळे स्वान अ‍ॅशेस मालिकेतील उर्वरित दोन कसोटीत उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी माँटी पानेसरला संघात स्थान मिळू शकते.
‘‘स्वानने इंग्लिश क्रिकेटसाठी  मोलाचे योगदान दिले आहे. खेळाप्रती त्याची निष्ठा आणि व्यावसायिक वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्याच्याशिवाय इंग्लंड ड्रेसिंगरूम वेगळीच भासणार आहे. भावी योजनांसाठी त्याला मन:पूर्वक शुभेच्छा,’’ असे इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा