आठवडय़ाची मुलाखत : अभिमन्यू पुराणिक, ग्रँडमास्टर
जागतिक स्तरावर चमक दाखवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या बुद्धिबळपटूंच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय मास्टर व ग्रँडमास्टर हे दोन महत्त्वाचे टप्पे असतात. हे दोन्ही टप्पे मी पार केले असल्यामुळे आता वरिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवण्याचेच ध्येय ठेवत मी खेळणार आहे, असा निर्धार नवा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकने केला आहे.
अभिमन्यूने अबू धाबी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ग्रँडमास्टर किताबावर मोहोर उमटवली. हा किताब मिळवणारा तो महाराष्ट्राचा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. सात वर्षांचा असताना त्याने ग्रीसमधील जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवताना नऊ फेऱ्यांमध्ये नऊ गुणांची कमाई करीत निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्याने आपल्या बारा वर्षांच्या कारकीर्दीमध्ये अनेक स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. त्याच्या आजपर्यंतच्या कामगिरीविषयी व पुढच्या वाटचालीबाबत त्याच्याशी केलेली खास बातचीत
* ग्रँडमास्टर किताब एवढय़ा लवकर मिळेल अशी अपेक्षा होती काय?
हो, जागतिक स्तरावर खऱ्या अर्थाने वाटचाल करायची असेल तर ग्रँडमास्टर किताब अनिवार्य असतो. जेव्हा मी या खेळात कारकीर्द घडवण्याचे निश्चित केले, तेव्हा हा किताब लवकरात लवकर मिळवण्याचे माझे ध्येय ठरवले. त्यापूर्वी मी आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला होता. तेथून माझा आत्मविश्वास उंचावला होता. सुदैवाने ग्रँडमास्टर किताबाकरिता खूप संघर्ष करावा लागला नाही.
* हा किताब मिळवल्यानंतर तुझे मुख्य ध्येय कोणते आहे?
बुद्धिबळ खेळात कारकीर्द घडवणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विश्व अजिंक्यपद मिळवण्याची इच्छा असते. भारताच्या विश्वनाथन आनंदने पाच वेळा ही कामगिरी केली आहे. मलाही त्याच्यासारखीच कामगिरी करावयाची आहे. अजूनही मी कनिष्ठ गटातील खेळाडू असल्यामुळे मला त्यादृष्टीने भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विविध स्पर्धामधील सहभागाचे नियोजन करणार आहे. यासाठी माझ्या घरच्यांचे भरपूर सहकार्य लाभत असते.
* कारकीर्दीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा अनुभव कसा होता?
ग्रीसमध्ये दहा वर्षांपूर्वी मी जागतिक वयोगट स्पर्धेत सहभागी झालो होतो. तेथे इस्रायलचा लिव्हॉन डॅनियल हा संभाव्य विजेता मानला जात होता. त्याला मी हरवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. त्या वेळी त्याच्या आईला निकालाविषयी खात्री वाटत नव्हती. तिने मला लिव्हॉनशी पुन्हा डाव खेळावयास सांगितल्यानंतर मी त्याच्याशी पुन्हा लढलो व विजय मिळवला. या स्पर्धेत मी सहभागी व्हावे, असे द्रोणाचार्य विजेते रघुनंदन गोखले यांनी माझ्या पालकांना सुचवले. एवढेच नव्हे त्यांनी माझ्या शाळेलाही पत्र लिहून कळवले. त्यांच्यामुळेच मला हे विजेतेपद मिळवता आले.
* आजपर्यंतच्या वाटचालीचे श्रेय कोणास देता येईल?
बुद्धिबळाचे बाळकडू मी मकरंद वेलणकर यांच्या अकादमीत आत्मसात केले. खरेतर त्या वेळी केवळ हौसेखातर मी शिकत होतो. मात्र त्यांच्या जल्लोष स्पर्धेत भाग घेत यश मिळविल्यानंतर या खेळात कारकीर्द घडवण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांचेही माझ्यावर मोठे ऋण आहे.
* विविध स्पर्धाच्या निमित्ताने तू अनेक देशांमध्ये खेळला आहे. त्यापैकी सर्वात मुलखावेगळा अनुभव कोणता?
रशिया हे बुद्धिबळाचे माहेरघर मानले जाते. तेथील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळाली आहे. तेथील स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांचाही या खेळाबाबत सखोल अभ्यास असतो. तसेच तेथील वातावरण खेळासाठी सकारात्मक असते. परदेशी खेळाडूंची शैली, त्यांची देहबोली, मानसिक स्थिती याबाबतही ते बारकाईने निरीक्षण करीत असतात.
* इंटरनेट व प्रत्यक्ष पटावरील सराव यापैकी कोणता सराव अधिक चांगला असतो?
इंटरनेटद्वारा भरपूर डावपेचांची माहिती मिळत असली तरीही प्रत्यक्ष पटावर प्रतिस्पर्धी खेळाडूशी डाव खेळताना तुम्हाला अनेक विविध तंत्रांची व व्यूहरचनांची माहिती होत असते. विविध तंत्रांपैकी ब्लिट्झ डाव मला जास्त आवडतात. त्याचप्रमाणे पांढऱ्या मोहरांनी खेळताना मी जास्त मोकळेपणाने खेळू शकतो. त्यामुळेच मी अनेक लहानमोठय़ा खेळाडूंबरोबर प्रत्यक्ष सामना खेळण्यास जास्त प्राधान्य देतो. पूरक व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार, प्राणायाम व योगासने नियमित करीत असतो. त्याचा फायदा मला भावी कारकीर्दीत देशाचे नाव उंचावण्यासाठी मदत होणार आहे याची मला खात्री आहे.