तुषार वैती
आर्यलडचे माजी फुटबॉलपटू टेरी फेलान यांचे मत
मुंबई : मँचेस्टर सिटीने अलीकडेच इंग्लिश प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धाची जेतेपदे मिळवली आहेत. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत खेळण्याचे त्यांचे स्वप्न अनेकदा अधुरे राहिले आहे. त्यामुळे यंदा मँचेस्टर सिटीला जेतेपद पटकावण्याची उत्तम संधी आहे, असे आर्यलडचे माजी फुटबॉलपटू टेरी फेलान यांनी सांगितले.
टेरी फेलान यांनी १९९२-९५च्या दरम्यान मँचेस्टर सिटी आणि त्यानंतर १९९७पर्यंत चेल्सी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील केरळ ब्लास्टर्स संघाचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या टेरी फेलान यांनी शनिवारी मध्यरात्री मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीविषयी आपली मते मांडली.
ते म्हणाले की, ‘‘मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंसाठी, साहाय्यक प्रशिक्षकांसाठी तसेच चाहत्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे. पण चॅम्पियन्स लीगचे जेतेपद त्यांना सहजपणे पटकावता येणार नाही. यावर्षी मँचेस्टर सिटीने चेल्सीला दोन वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. क्लबस्तरावरील जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मँचेस्टर सिटीला पहिल्यांदाच मिळाली आहे. त्यामुळे कधीही न मिळवलेले जेतेपद आपल्याकडे आणण्याची मँचेस्टर सिटीसाठी हीच सुवर्णसंधी असणार आहे.’’
‘‘चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव चेल्सीकडे आहे. त्यांचे अनेक खेळाडू २०१२च्या अंतिम फेरीत खेळले आहेत. पण नव्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना त्यांचा कस लागणार आहे. चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवणे, गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर असेल,’’ असेही फेलान म्हणाले.