गॉर्डन ग्रीनिज, ग्रॅहम गूच आणि मॅथ्यू हेडनसारखे सर्वोत्तम सलामीवीर मी गेल्या ४० वर्षांमध्ये पाहिले, पण सुनील गावस्कर यांचा दर्जा काही वेगळाच होता. त्यांच्यासारखा महान सलामीवीर मी आजपर्यंत पाहिलेला नाही. त्यांचे तंत्र, बचाव, जिगर याला तोडच नाही. क्रिकेट- विश्वामध्ये गावस्करांनी भारताला ओळख दिली, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले, निमित्त होते गावस्कर यांचा ‘दी लीजंड्स ग्रुप’मध्ये समावेश करण्याचे.
विनू मंकड, विजय हजारे आणि विजय र्मचट या तिन्ही महान क्रिकेटपटूंपाठोपाठ ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘दी लीजंड्स क्लब’मध्ये क्रिकेटविश्वाला भारताची दखल घ्यायला लावणाऱ्या भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा समावेश करण्यात आला. काही कारणास्तव गावस्कर इंग्लंडला असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या वतीने हा बहुमान गावस्कर यांचे मित्र रवी शास्त्री यांनी स्वीकारला. या वेळी शास्त्री यांच्यासह बापू नाडकर्णी, मिलिंद रेगे, शिशिर हतंगडी यांसारखे क्रिकेटमधील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शास्त्री यांनी गावस्कर यांचा एक किस्सा सांगितला. १९८३ च्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये गावस्कर यांच्या धावा होत नव्हत्या. गयाना येथील तिसऱ्या सामन्यात गावस्कर ४९ धावांवर खेळत होते आणि समोर होता माल्कम मार्शल. माल्कमने पहिला जोरदार बाऊन्सर टाकला, तो गावस्कर यांच्या कपाळाला लागला आणि चेंडू १०-१५ फूट लांब पडला. आता काय होणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती, कारण माल्कम त्या वेळी आग ओकत होता. त्यानंतरच्या चेंडूसाठी माल्कम धावला तेव्हा आम्हा सर्वाची हृदये धडधडायला लागली होती. पण गावस्करांनी माल्कमच्या पायाच्या बाजूने खणखणीत ‘स्ट्रेट डाइव्ह’ मारला आणि त्यानंतर त्यांनी धावांची टांकसाळ उघडली. याच सामन्यात त्यांनी नाबाद १४७ धावांची खेळी साकारली होती.

Story img Loader