Fans’ enthusiasm less for India-Netherlands Match: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक २०२३ पूर्वीचा सराव सामना शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी पावसामुळे वाया गेला. नाणेफेकीनंतर गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडला आणि एकही चेंडू खेळला गेला नाही. यानंतर टीम इंडियाला मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. हा सामना संजू सॅमसनचे शहर तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल. मात्र, प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल फारसा उत्साह नाही. त्यामुळे या सामन्यांची तिकिटे विकली जात नाहीत.
ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३८ हजारांहून अधिक आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड सामन्यादरम्यान अनेक स्टँड रिकामे राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्याबाबत उत्सुकता दिसून येत नाही.
आतापर्यंत सुमारे १६,००० तिकिटांचीच ऑनलाइन विक्री –
स्पोर्टस्टारने केरळ क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांचा हवाला देत माहिती दिली आहे की, टीम इंडिया आणि नेदरलँड यांच्यातील सामन्याची आतापर्यंत सुमारे १६,००० तिकिटे ऑनलाइन विकली गेली आहेत. सराव सामना असल्याने टेरेस ब्लॉकसाठी तिकिटाची किंमत ३०० रुपये आणि पॅव्हेलियनसाठी ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेच्या अधिकृत तिकीट भागीदार बुक माय शो अॅपला भेट दिल्याने असे दिसून आले की टेरेसेस ए, बी, सी, एफ, एच आणि जे मध्ये अनेक तिकिटे उपलब्ध आहेत, तर फक्त जी आणि डी ब्लॉकची तिकिटे विकली गेली आहेत. त्याचप्रमाणे नऊ पॅव्हेलियन स्टँडपैकी केवळ तीनच स्टँडच्या तिकीटांची विक्री झाली आहे.
हेही वाचा – IND vs AUS: “…तर रोहित शर्माला थांबवणे कठीण असते”; मार्नस लाबुशेनचे हिटमॅनच्या फलंदाजीबाबत मोठं वक्तव्य
हवामान लक्षात घेता, चाहत्यांनी दाखवले कमी स्वारस्य –
केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी स्पोर्टस्टारला सांगितले, “तिकीट प्रक्रिया आयसीसीद्वारे हाताळली जात आहे, परंतु त्रिवेंद्रमची तिकिटे टप्प्याटप्प्याने ऑनलाइन जारी करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्याची तिकिटे लवकर विकली गेली. तथापि, जेव्हा काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्याची तिकिटे जाहीर झाली, तेव्हा चाहत्यांनी हवामानाचा विचार करून कमी स्वारस्य दाखवले.”
भारतीय संघ कधी पोहोचणार?
टीम इंडिया रविवारी दुपारी चार्टर्ड फ्लाइटने तिरुअनंतपुरमला पोहोचणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया शहरात आल्यावर तिकीटांची विक्री वाढेल अशी जॉर्जला आशा आहे. ते म्हणाले, “दुर्दैवाने तिरुवनंतपुरम आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. साहजिकच चाहत्यांनी तिकीट बुक करण्यापूर्वी प्रतीक्षा करत असून हवामानाची परिस्थिती बघत आहेत.”
सराव सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता कमी –
स्पोर्टस्टारच्या मते, सराव सामन्यात चाहत्यांमध्ये कमी उत्सुकता आहे. फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणारा क्रिकेट फॅन अमलजीत एआर म्हणाला, “मी मॅच बघायला जाईन, पण बरेच मित्र जात नाहीत. कारण मॅच कामाच्या दिवशी आहे. त्याचबरोबर कमकुवत संघाविरुद्ध सराव सामना असून तिकीटांची किंमत जास्त आहे. कमकुवत संघाविरुद्ध सराव सामना. कोची क्रिकेट चाहते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जॉन्स बेनी यांच्या मते बरेच चाहते लांबचा प्रवास टाळण्यासाठी सामना पाहणे टाळत आहेत. “कोचीहून त्रिवेंद्रमला पोहोचण्यासाठी सुमारे १०-१२ तास लागतात, ते बरेच अंतर आहे,” तो म्हणाला.
संजू सॅमसन टीम इंडियाचा भाग नसल्याने पडतोय फरक –
सोशल मीडियावर अशीही चर्चा आहे की चाहते टीम इंडिया-नेदरलँड्स सामन्यात रस दाखवत नाहीत. कारण संजू सॅमसनसारखा केरळचा कोणताही स्थानिक खेळाडू संघाचा भाग नाही. आणखी पावसाच्या शक्यतेमुळे संघांच्या तयारीवर परिणाम होत आहे. ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये इनडोअर सराव सुविधा नाहीत, पण संघ केसीएच्या संपर्कात आहेत. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास प्रशिक्षणासाठी काही स्थानिक खाजगी इनडोर सुविधा वापराव्यात अशी त्यांची इच्छा आहे.