बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आयसीसीने न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आयसीसीच्या नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ २ वर्षांचा आहे. झिम्बाब्वेच्या तवेंगवा मुकुहलानी यांनी माघार घेतल्याने बार्कले यांची बिनविरोध निवड झाली. आयसीसी बोर्डाने बार्कलेला पूर्ण पाठिंबा दिला.
बार्कले त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल म्हणाले, “चेंबरमन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत पुन्हा निवड होणे हा सन्मान आहे आणि त्यांच्या समर्थनासाठी मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांचे आभार मानू इच्छितो.”
बार्कले यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये आयसीसीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. ते यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटचे चेंबरमन आणि २०१५ मधील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे संचालक होते. ते बिनविरोध निवडून आलो याचा अर्थ १७ सदस्यीय मंडळात त्यांना बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) चाही पाठिंबा होता.
आयसीसीच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “प्रत्येक सदस्याने जय शाह यांना वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून स्वीकारले आहे. आयसीसी अध्यक्षांव्यतिरिक्त, ही एक तितकीच शक्तिशाली उपसमिती आहे. वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष नेहमीच आयसीसी बोर्ड सदस्य असतात आणि शाह यांच्या निवडीवरून हे स्पष्ट होते की, ते आयसीसी बोर्डावर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील.
या समितीचे प्रमुखपद एन श्रीनिवासन यांच्या काळात भारताचे होते. परंतु शशांक मनोहर यांच्या आयसीसी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बीसीसीआयची ताकद खूपच कमी झाली होती. खरे तर प्रशासक समितीच्या कार्यकाळात एक काळ असा होता, जेव्हा बीसीसीआयला वित्त आणि व्यावसायिक व्यवहारांच्या समितीमध्ये कोणतेही प्रतिनिधित्व नव्हते.