भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल हे आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या मित्रांनी एकत्र येत त्यांच्यासाठी निधी उभारणी केली आहे. हलाखीची परिस्थिती दूर व्हावी यासाठी मित्रांनी ऑनलाईन फंडरेझिंगच्या माध्यमातून पैसे जमवल्याचं चॅपेल यांनी सांगितलं. आता परिस्थिती सुधारली आहे पण मी आर्थिकदृष्ट्या सधन परिस्थितीत नक्कीच नाही असं चॅपेल यांनी स्पष्ट केलं.
७५वर्षीय चॅपेल हे २००५ ते २००७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांचा प्रशिक्षक म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग यांच्यातील वादाने त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतील नाट्यमय पर्व होतं. झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान ग्रेग यांनी पाठवलेला एक इमेल जगजाहीर झाला. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सौरव गांगुलीने कर्णधारपद सोडावे असं ग्रेग यांनी म्हटलं होतं. हा वाद वाढत गेला. या दौऱ्यानंतर गांगुलीला वनडे संघातून वगळण्यात आलं. २००७ वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळला. याची परिणिती ग्रेग यांची प्रशिक्षकपदावरून गच्छंती होण्यात झालं.
‘आम्ही डबघाईला आलोय, खाण्यापिण्याची भ्रांत आहे असं नक्कीच नाही पण आलिशान राहणीमानात जगतोय असंही नाही. क्रिकेटपटू असल्याने आमची राहणी विलासी असते असा लोकांचा समज आहे. मी गरीब आहे, मला सहानुभूती दाखवा असं मी म्हणत नाहीये पण सध्याच्या क्रिकेटपटूंना जे आर्थिक फायदे मिळतात ते आम्हाला मिळाले नाहीत’, असं चॅपेल यांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियातून आलेल्या वृत्तानुसार चॅपेल यांनी गो फंड मी पेजच्या स्थापनेसाठी अनिच्छेने परवानगी दिली. यानिमित्ताने मेलबर्न इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एडी मॅकग्युअर या कार्यक्रमाचे संयोजक होते. या कार्यक्रमाला ग्रेग यांचे बंधू इयन आणि ट्रेव्हर यांच्यासह क्रिकेटविश्वातील अनेक माजी खेळाडू उपस्थित होते.
आर्थिक चणचण भेडसावणारा आमच्या पिढीतील मी एकटाच नसल्याचं ग्रेग यांनी सांगितलं. ‘आमच्या पिढीतील अनेकांनी निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी पैसा आला पण त्याचा फायदा आम्हाला झाला नाही. खरं सांगायचं तर काही माजी खेळाडूंची अवस्था माझ्यापेक्षा हलाखीची अशी आहे. खेळाने त्यांना फारसं काही दिलं नाही. खेळाला कुठे न्यायचं याची जबाबदारी आता खेळत असलेल्या लोकांवर आहे’, असं चॅपेल म्हणाले.
केरी पॅकर यांच्या प्रसिद्ध वर्ल्ड सीरिज क्रिकेट या लीग स्वरुपाच्या पहिल्या स्पर्धेत डेनिस लिली, रॉड मार्श यांच्या बरोबरीने ग्रेग चॅपेलही सहभागी झाले होते. पण लिली-मार्श यांच्याप्रमाणे कारकीर्दीच्या शेवटी निधीउभारणीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने अशा परिस्थितीत जगावं हे योग्य नाही असं ग्रेग यांच्या मित्रांनी सांगितलं. ग्रेग हे चॅपेल फाऊंडेशन चालवतात. बेघर मुलांसाठी हे फाऊंडेशन काम करतं. पण फाऊंडेशनला मिळणारा प्रत्येक पैसा या मुलांसाठीच उपयोगात आणला जातो. ग्रेग यापैकी काहीही स्वत:साठी वापरत नाहीत असं ग्रेग यांचे मित्र पीटर मलोनी यांनी सांगितलं.
दर्शक मेहता हे फाऊंडेशनचं काम पाहतात. दरवर्षी वर्षअखेरीस बेघर मुलांसाठी पैसा दिला जातो. ते काहीही शिल्लक ठेवत नाहीत. नव्या वर्षापासून नवी सुरुवात होते.
‘तुम्ही तुमचं नाव फाऊंडेशनमध्ये द्या. जेणेकरुन येणाऱ्या निधीपैकी काही टक्के पैसे तुम्हाला मिळतील असं आम्ही ग्रेग यांनी सुचवलं. पण ग्रेग या पैशाला हातही लावत नाहीत. ग्रेग फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. या मुलांसाठी त्यांनी हजारो रुपये जमवले पण स्वत:साठी काहीही घेतलं नाही. आम्ही मित्र एकत्र आलो आहोत. २५०,००० डॉलर्स एवढी रक्कम जमवू शकू जेणेकरून ग्रेग यांची उर्वरित वर्ष चांगली जातील’, असं मलोनी यांनी सांगितलं.
चॅपेल यांनी ८७ कसोटीत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना ५३.८६च्या सरासरीने ७११० धावा केल्या. यामध्ये २४ शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. ४८ सामन्यात त्यांनी नेतृत्वाची धुराही सांभाळली. ७४ वनडेत त्यांनी ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना ४०.१८च्या सरासरीने २३३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये ग्रेग यांचा समावेश होतो.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर ग्रेग प्रशिक्षणाकडे वळले. साऊथ ऑस्ट्रेलिया संघासाठी काम केल्यानंतर ते पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत कार्यरत होते. ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीचाही ते भाग होते. मे २००५ मध्ये त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीत सौरव गांगुलीची भूमिका महत्त्वाची होती. मात्र ग्रेग यांच्या प्रशिक्षक म्हणून कार्यकाळात परिस्थिती हाताबाहेर गेली.