ला लिगा फुटबॉल स्पर्धा

फ्रान्सचा नामांकित आघाडीपटू आणि बार्सिलोनाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक अँटोइन ग्रीझमनने रविवारी मध्यरात्री संघसहकारी लिओनेल मेसी आणि बास्केटबॉलपटू लीब्रोन जेम्स यांच्या शैलीचे अनुकरण करून दोन गोल नोंदवले. त्याच्या योगदानामुळे बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल बेटिसला ५-२ अशी धूळ चारली.

बेटिससाठी नेबिल फेकिरने १५व्या मिनिटाला पहिला गोल केला; परंतु ग्रीझमनने ४१व्या आणि ५०व्या मिनिटाला दोन गोल नोंदवून बार्सिलोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यामधील पहिला गोल ग्रीझमनने मेसीच्या शैलीत डाव्या पायाचा कल्पकतेने वापर करून केला, तर गोल केल्यानंतर त्याने जेम्सच्या शैलीत आनंद साजरा केला. ग्रीझमनचा १४ सामन्यांत बार्सिलोनासाठी हा पहिलाच गोल ठरला.

ग्रीझमनव्यतिरिक्त, कार्लस पेरेझ (५६), जॉर्डी अल्बा (६०) आणि अर्टुरो विदाल (७७) यांनीही बार्सिलोनासाठी प्रत्येकी एक गोल केला. जिसस गार्सियाने (७९) बेटिससाठी दुसरा गोल झळकावला; परंतु उर्वरित वेळेत ते तीन गोल करण्यात अपयशी ठरले.

Story img Loader