महिला गटात रा. फ. नाईक, तर पुरुष गटात पश्चिम रेल्वेची बाजी
यजमान ग्रिफीन जिमखाना संघाने एकहाती वर्चस्व गाजवत कुमार गटाच्या (१८ वर्षांखालील) राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावले. ग्रिफीन जिमखाना आयोजित आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने कौपरखरणे येथे या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांच्या त्रिजिल्हास्तरीय गटात रा. फ. नाईक संघाने, तर पुरुषांच्या व्यावसायिक गटाच्या निमंत्रित स्पध्रेत पश्चिम रेल्वेने बाजी मारली. कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ग्रिफीन संघाने महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीचा ११-१० असा १ डाव व १ गुणाने पराभव केला. ग्रीफीनच्या आदित्य कांबळे (२.२० मि., ३ मि. व २ गडी), अमेय झगडे (२ मि.), संकेत कदम (२ मि., १.२० मि. नाबाद व २ गडी ) व चिराग आंगलेकर (१.४० मि. व १.३० मि.) यांनी अष्टपैलू खेळ केला.
महिला गटात रा.फ.नाईक संघाने बदलापूरच्या शिवभक्त विद्यामंदिरचे कडवे आव्हान १०-९ असे मोडून काढले. शिवभक्तने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले, मध्यंतराला रा.फ.नाईक संघाकडे २ गुणांची आघाडी होती. सामन्याच्या दुसऱ्या डावात प्रथम आक्रमणात रा.फ.नाईक संघाने ५ गुण नोंदवले. विजयासाठी शिवभक्त संघाला ८ गुणांची गरज होती. रा.फ. नाईकची आघाडीची खेळाडू पौर्णिमा सकपाळला झटपट बाद केल्यावर शिवभक्तच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु नाईकच्या खेळाडूंनी अखेपर्यंत किल्ला लढवत १ गुणाने विजय मिळवला. विजयी संघाच्या प्रणाली मगर, दीक्षा कदम, शीतल भोर, रूपाली बडे व तेजश्री कोंढाळकर चमकल्या. शिवभक्तच्या कविता घाणेकर, प्रियांका भोपी, गुलाब म्हसकर व मीनल भोईरने कडवी झुंज दिली. व्यावसायिक गटात रंगतदार सामन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई महानगरपालिकेला १७-१२ असे पराभूत केले. रेल्वेच्या अमित पाटील, तक्षक गौंडाजे, अमोल जाधव व मनोज पवार यांनी उल्लेखनीय खेळ केला. महापालिकेच्या लक्ष्मण गवस, गणेश दळवी व श्रेयस राऊळ यांचे प्रयत्न तोकडे पडले.
आदित्य कांबळे (कुमार), प्रणाली मगर (महिला) आणि मनोज पवार (व्यावसायिक) स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. ऋहृषीकेश मुर्चावडे (कुमार), प्रियांका भोपी (महिला) आणि श्रेयस राऊळ (व्यावसायिक) स्पध्रेतील सर्वोत्तम संरक्षक ठरले. तर संकेत कदम (कुमार), शीतल भोर (महिला) आणि अमोल जाधव (व्यावसायिक) स्पध्रेतील सर्वोत्तम आक्रमक ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा