अँडी मरेने गेल्यावर्षी तब्बल ७६ वर्षांची इंग्लंडवासियांची विम्बल्डन जेतेपदाची प्रतीक्षा संपवत जेतेपदावर नाव कोरले होते. मात्र यंदा खराब फॉर्म आणि दुखापती यांनी त्रस्त मरेला हे जेतेपद राखता आले नाही. अकराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने मरेवर मात करत सनसनाटी विजय मिळवला. अन्य लढतीत जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या अनुभवी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये सिमोन हालेप आणि इग्युेन बोऊचार्ड यांनीही उपांत्य फेरी गाठली.
नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत झटपट पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मरेने माजी खेळाडू अ‍ॅमेली मॉरेस्मोला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांची नियुक्तीही मरेचे गतविजेतेपद राखू शकली नाही.
राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा यांच्यापाठोपाठ गारद होणाऱ्या मानांकित खेळाडूंच्या यादीत मरेचा समावेश झाला आहे. बल्गेरियाच्या दिमित्रोव्ह याने त्याचा ६-१, ७-६ (७-४), ६-२ असा दोन तासात पराभव केला व उपांत्य फेरीत स्थान मिळविले. दिमित्रोव्हच्या झंझाावाती खेळापुढे मरे निष्प्रभ ठरला. त्याच्या हातून झालेल्या भरपूर चुकांचा दिमित्रोव्हने फायदा उठवला.
रॉजर फेडररने स्वित्र्झलडच्याच स्टॅनिसलॉस वॉवरिन्काविरुद्ध खेळताना पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर जिद्दीने पुनरागमन करत शानदार विजय मिळवला. फेडररने हा सामना ३-६, ७-६ (७-५), ६-४, ६-४ अशी जिंकली.
अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने २६व्या मानांकित मारिन चिलीचला ६-१, ३-६, ६-७ (४-७), ६-२, ६-२ असे नमवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. महिलांमध्ये इग्युेन बोऊचार्ड आणि सिमोन हालेप यांनी आपापल्या लढती जिंकत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
फ्रेंच स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या रुमानियाच्या सिमोनी  हालेप खेळाडूने १९ व्या मानांकित सबिन लिइस्कीचे आव्हान ६-४, ६-० असे संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीतील एकतर्फी लढतीत तिसऱ्या मानांकित हालेपने पहिल्या सेटमध्ये एकदा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला तर दुसऱ्या सेटमध्ये तिने तीन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. तिने केलेल्या परतीच्या सुरेख फटक्यांपुढे लिसिकी हिचा बचाव निष्प्रभ ठरला. तेराव्या मानांकित इग्युेन बोऊचार्डने अनपेक्षित विजयाची मालिका राखताना नवव्या मानांकित अँजेलिक कर्बरची सनसनाटी घोडदौड संपुष्टात आणली. तिने ६-३, ६-४ असा विजय मिळविला. कर्बरने आधीच्या लढतीत मारिया शारापोव्हाला पराभवाचा धक्का दिला होता.
बोपण्णाची आगेकूच
भारताच्या रोहन बोपण्णाने चेक प्रजासत्ताकच्या आंद्रिया हॅलव्हाकोवा हिच्या साथीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत मिश्रदुहेरीत आगेकूच केली. या जोडीने कॉलिन फ्लेमिंग व जॉसीलिन रे यांच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली. या जोडीचा पुढच्या फेरीत मिखाईल एल्गिन  व अनास्ताशिया रोडिनोवा जोडीशी मुकाबला होणार आहे. पाचव्या मानांकित लिएण्डर पेस-राडेक स्टेपानेक जोडीने होरिआ टेकाऊ आणि जिन ज्युलिनन रोजर जोडीवर ६-४, ६-७ (५-७), ६-४, ७-५ असा विजय मिळवला.  

Story img Loader