ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचे स्पष्ट मत
‘‘वस्तू व सेवा कर (जीएसटी)मुळे क्रीडा साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत आणि यामध्ये खेळाडू भरडले जातील. केंद्र सरकारमधील काही अधिकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली आहे आणि कदाचित क्रीडा साहित्यावरील कराचा पुनर्विचार होईल. ‘जीएसटी’मुळे आयात करण्यात येणारी क्रीडा साहित्ये अधिक महाग होतील. त्याचा थेट फटका खेळाडूंना बसेल,’’ असे स्पष्ट मत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केले. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेत १० मीटर एअर रायफल प्रकारात बिंद्राने सुवर्णपदकाची कमाई केली होती आणि ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. ‘टुरिझम ऑस्ट्रेलिया’तर्फे सोमवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमात तो बोलत होता. या वेळी २०१८ साली गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पध्रेची घोषणा करण्यात आली.
या वेळी ऑस्ट्रेलियातील आठवणींना उजाळा देताना बिंद्रा म्हणाला, ‘‘माझा ऑलिम्पिक स्पध्रेचा प्रवास ऑस्ट्रेलियामधून सुरू झाला. १७ वर्षांचा असताना २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये मी खेळलो होतो. त्यानंतर मी पाच ऑलिम्पिक स्पध्रेत देशाचे प्रतिनिधित्व केले, परंतु सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा माझ्यासाठी विशेष आहे. येथे मला १० किंवा ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्या कामगिरीने मला एक दिवस आपण ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास दिला होता.’’
तू, गगन नारंग, अंजली भागवत आणि सुमा शिरूर ही भारतातील सर्वोत्तम नेमबाजांची फळी होती असे आपण म्हणू शकतो का, या प्रश्नावर बिंद्रा म्हणाला, ‘‘हे मी ठरवू शकत नाही. ते तुम्हीच सांगू शकता. मात्र तो आनंददायक काळ होता. त्या वेळी नेमबाजी हळूहळू वाढत होती. आता नेमबाजी सर्वाना माहीत आहे आणि राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धामध्ये आपले नेमबाज पदक जिंकत आहेत. आमच्या वेळी नेमबाजी बाल्यावस्थेत होती. त्या पिढीत घडणे आणि पदक जिंकणे, हा निराळा अनुभव होता. आताच्या खेळाडूंना अनेक संधी मिळतात, देशांतर्गतच मार्गदर्शन मिळते. पण आमच्यावेळी अशी परिस्थिती नव्हती.’’
राष्ट्रकुल स्पर्धामधील भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे आणि त्यात नेमबाजांचा वाटा अधिक आहे. हीच कामगिरी २०१८च्या राष्ट्रकुल स्पध्रेतही पाहायला मिळेल, अशी आशा बिंद्राने व्यक्त केली. मात्र त्याच वेळेला त्याने राष्ट्रकुल स्पध्रेचे महत्त्व अधोरेखित केले. तो म्हणाला, ‘‘खेळाडूची कारकीर्द घडवण्यात राष्ट्रकुल स्पर्धाचा महत्त्वाचा वाटा आहे. राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक या अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश असल्यामुळे खेळाडूची कसोटी लागते. ऑलिम्पिक स्पध्रेच्या तयारीसाठी या स्पर्धा मैलाचा दगडच आहे. प्रत्येक स्पर्धाचा दर्जा वेगवेगळा असतो, परंतु या तिन्ही स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.’’
रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील निराशाजनक कामगिरीनंतर पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धाच्या तयारीसाठी नेमलेल्या कृतीदल समितीत बिंद्राचा समावेश आहे. त्याबद्दल त्याने सांगितले की, ‘‘कृतीदल समितीच्या शिफारस समितीत मी आहे आणि ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी काय करायला हवे, याच्या शिफारसी आम्ही केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याबाबत मला माहिती नाही.’’
१२ ते २८ टक्के कर
जीएसटीच्या यादीत क्रीडा साहित्याचा समावेश करण्यात आल्यानंतर नेमबाजांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेमबाजांना बहुतेक साहित्य आयात करावे लागले. याआधी क्रीडा उत्पादकांना दोन टक्के अबकारी शुल्क भरावा लागायचा, परंतु जीएसटीमुळे क्रीडा साहित्यावर १२ ते २८ टक्के कर लावण्यात येत आहे. त्यात पिस्तूलसाठी २८ टक्के, तर रायफल, शॉटगन आणि दारूगोळ्यासाठी १८ टक्के कर आकारण्यात येत आहे.
..तो एकटा प्रेक्षक अन् आश्चर्याचा धक्का
कारकीर्दीतील अनेक स्पर्धामध्ये रिकाम्या बाकांसमोरच मला खेळावे लागले. मात्र इंग्लंडमध्ये एका स्पध्रेदरम्यान एकटा प्रेक्षक माझ्या नावाचा जयघोष करत होता आणि मला प्रोत्साहन देत होता. तो क्षण आयुष्यातील सर्वात धक्कादायक होता. प्रतिस्पर्धीसोबत स्पर्धा करतानाही मला कधी एवढा धक्का बसला नव्हता, असे मत बिंद्राने व्यक्त केले.