तुल्यबळ चीन तैपेई संघावर विजय मिळाल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतास आशियाई फुटबॉल चॅलेंज चषक पात्रता स्पर्धेत सोमवारी गुआम संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
नेदरलँड्सचे ज्येष्ठ खेळाडू विम कोव्हरमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या भारताने पहिल्या सामन्यात तैपेईवर निसटता विजय मिळविला असला, तरी हा विजय त्यांच्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. गुआम संघास सलामीच्या लढतीत यजमान म्यानमार संघाने ५-० अशी धूळ चारली होती. हा सामना गमावल्यामुळे आव्हान टिकविण्यासाठी गुआम संघ उद्याच्या लढतीत ईर्षेने खेळण्याची शक्यता आहे.
भारताचे प्रशिक्षक कोव्हरमन्स यांनी सांगितले, गुआम हा कमकुवत संघ असला तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही. प्रत्येक सामना आम्ही गांभीर्यानेच घेत आहोत. जर आम्ही गाफील राहिलो, तर प्रतिस्पर्धी संघ केव्हाही डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅलेस्टाइनविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्यात केवळ सात मिनिटांत खेळाचे पारडे आमच्याविरुद्ध गेले व आम्ही सामना गमावला होता. येथेही आम्ही सलामीच्या लढतीत अनेक हुकमी संधी वाया घालविल्या. या चुका यापुढील सामन्यात होणार नाहीत याची आम्ही काळजी घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात प्रत्येक क्षण गांभीर्यानेच घ्यावा लागतो. केव्हाही सामन्यास कलाटणी मिळू शकते. गोल करण्यासाठी झगडावेच लागते. म्यानमार संघाविरुद्ध गुआम संघास गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या मात्र या संधी त्यांनी वाया घालविल्या. भारताचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला, पहिला सामना जिंकून तीन गुण मिळविण्याचे आमचे ध्येय होते आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो. आता आम्ही पुढच्या आव्हानास सामोरे जाण्यास तयार झालो आहोत.

Story img Loader