रणजी करंडक स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने पहिल्या डावात अवघ्या १५४ धावांमध्ये खुर्दा उडवला. मुंबईला या अखेरच्या साखळी सामन्यामध्ये विजय आवश्यक असला तरी पहिल्या डावातील निराशाजनक कामगिरी पाहता त्यांच्यासाठी हा सामना जिंकणे कठीण असेल. मुंबईला झटपट बाद केल्यानंतर गुजरातने पहिल्या दिवसअखेर २ बाद ९० अशी मजल मारली असून ते अजूनही ६४ धावांनी पिछाडीवर आहेत.
मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या तो चांगलाच अंगलट आला. ईश्वर चौधरीने कर्णधार वसिम जाफरला (१६) बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर मुंबईचा संघ सावरू शकलाच नाही. कौस्तुभ पवार (३७) आणि इक्बाल अब्दुल्ला (३०) यांनी थोडाफार प्रतिकार केला, पण त्यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईच्या फलंदाजीला ताठर कणा नसल्याचे गेल्या काही सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आणि त्याचा प्रत्यय या सामन्यामध्येही पाहायला मिळाला. गुजरातकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
मुंबईचा १५४ धावांवर खुर्दा उडवल्यावर फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने शतकासमीप धावसंख्या पोहोचवली. समित गोहेल (नाबाद ३६) आणि भार्गव मेरई (३७) यांच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरातने दिवसअखेर २ बाद ९० अशी मजल मारली आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) ५२.४ षटकांत सर्वबाद १५४ (कौस्तुभ पवार ३७, इक्बाल अब्दुल्ला ३०; अक्षर पटेल ३/३२)
गुजरात (पहिला डाव) : ३५ षटकांत २ बाद ९० (समित गोहेल खेळत आहे ३६, भार्गव मेरई ३७ ; इक्बाल अब्दुल्ला १/२५).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा