वेणुगोपाल रावची स्फोटक फलंदाजी आणि रोहित दहियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० लढतीत सौराष्ट्रावर ६२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरातचे मुंबई आणि महाराष्ट्रासह आठ गुण झाले. मात्र सरस धावगतीच्या आधारावर गुजरातने सय्यद मुश्ताक अली अव्वल साखळी स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. बडोद्याने १६ गुणांसह याआधीच आगेकूच केली आहे.
वेणूगोपालने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह साकारलेल्या नाबाद ६१ धावांच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत ४ बाद १५० धावा उभारल्या. हे आव्हान पेलताना मध्यमगती गोलंदाज दहियाच्या गोलंदाजीपुढे सौराष्ट्रचा डाव अवघ्या ८८ धावांत गडगडला. दहियाने १० धावा देत चार बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : २० षटकांत ४ बाद १५० (वेणूगोपाल राव नाबाद ६१, राजदीप दरबार ३९; जयेश ओडेदरा १/१८) विजयी वि. सौराष्ट्र : १८.२ षटकांत सर्व बाद ८८ (विशाल जोशी १६; रोहित दहिया ४/१०, रुजुल भट २/१७).

Story img Loader